पळसगाव रस्ता झाल्याने अनेक वर्षांची ग्रामस्थांची मागणी पूर्ण
रस्त्याचे ना. भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते उद्घाटन

प्रतिनिधी – अरुण पवार ( माणगाव ) माणगाव तालुक्यातील पुर्व भागातील पळसगाव येथील रस्ता करण्याची तेथील पंचक्रोशीतील लोकांची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होती. ती मागणी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी पूर्ण केली. सुमारे ६० लाख रुपये खर्च करून डांबरीकरण करण्यात आलेल्या या नवीन रस्त्याचे उद्घाटन मंत्री भरत गोगावले यांनी केले. हा मुख्य रस्ता झाल्याने पंचक्रोशीतील लोकांनी आनंद साजरा करीत त्यांचे आभार मानले.
पळसगाव खुर्द ते पळसगाव बुद्रुक येथील रस्ता जवळच्या सुमारे २० गावांना जोडणारा असून येथून निजामपूर मार्गे रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी सोपे होणार आहे. तसेच येथील दरीमध्ये सुमारे ७० कोटी रुपये खर्चून पिण्याच्या पाण्यासाठी मोठे धरण बांधण्याची घोषणा करुन ना. भरत गोगावले यांनी अधिकाऱ्यांसह जागेची पाहणी केली. या धरणामुळे या भागातील सुमारे ४० गावांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार आहे. त्यामुळे हा रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली गावे हिरवीगार होतील. या परीसरात ना. भरत गोगावले यांनी यापूर्वी खर्डी ते नेराव रस्ता १ कोटी रुपये, कडापुर ते जोर १ कोटी रुपये, जांभूळ वाडी ते कातेची वाडी १ कोटी रुपये, इंदापूर, भाले, निजामपूर, पळसगाव ते पाचाड रस्ता आणि गांगुली येथील छत्रपती शाहू महाराज जन्मस्थान स्मारक बांधण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला असून ही सर्व विकास कामे सुरू आहेत.
या रस्त्यांचे जाळे निर्माण केल्याने या दुर्गम आणि डोंगराळ भागात रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. त्यामुळे रोजगाराची संधी उपलब्ध झाल्या आहेत. तसेच माणगाव जवळील ढालघर जोड रस्ता ते पाचाड रस्ता झाल्याने ३० किलोमीटरने अंतर कमी झाले आहे. त्यामुळे पर्यटक पालघर फाटा आणि निजामपूर हे दोन शॉर्ट कटचा सर्रासपणे वापर करतात.
माणगाव तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत गांगवली पळसगाव खुर्द येथील पूर्ण केलेल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ ग्रामस्थ महिला भगिनी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. सदर रस्ता अर्थसंकल्प योजनेअंतर्गत पूर्ण करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित विभागातील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी उपस्थित उप जिल्हा प्रमुख सुरेश महाडिक युवा सेना सचिव अच्युत तोंडलेकर उप सरपंच अनिल वणगुले, तसेच माजी उप तालुका प्रमुख नितीन पवार, इत्यादी उपस्थित होते.