रोहा शहरातील धनगर आळी, अंधारआळी आणि अष्टमी येथे गावठी दारु विक्री जोमात..
पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने स्थानिकांमध्ये नाराजी

रोहा ( विशेष प्रतिनिधी ) – रोहा तालुक्यात अवैध धंद्यानी उन्मात मांडला असून सद्धस्थितीत रोहा शहरातच गावठी दारु आणि हातभट्ट्या जोमात चालु असून हातभट्टीची दारु सहजपणे उपलब्ध होत असल्याने अनेक तरुण या गावठी दारुच्या आहारी गेलेले आहेत. यामुळे अनेक महिलांच्या कपाळावरील कुंकू पुसले गेलेत, चिमुकल्यांना समजण्यापुर्वीच त्यांच्या वडिलांचे छत्र या गावठी दारुच्या आहारी गेल्याने हरपले आहे त्यामुळे चिंताजनक वस्तुस्थिती सध्या तालुक्यात पहायला मिळत आहे.
रोहा शहरातील अष्टमी, धनगर आळी तसेच अंधारआळी येथे राजरोसपणे गावठी दारु घरांतून विकली जात असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. ही गावठी दारु मुबलक प्रमाणात आणि कमी दरात मिळत असल्याने अल्पवयीन मुलेसुद्धा या व्यसनाच्या आहारी गेले आहेत त्यामुळे घराच्या आजूबाजुने येणाऱ्या जाणाऱ्या महिला तरुणींना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावठी दारु बनविणे, विक्री करणे कायद्याने गुन्हा असताना देखील रोहा शहरातच अशा प्रकारे दारु विक्री होत असल्यामुळे पोलिस प्रशासन या अवैध गावठी दारु विक्री करणाऱ्यांवर का कारवाई करत नाही असा प्रश्न स्थानिक नागरीक उपस्थित करीत असून पोलिस प्रशासनाविरोधात नाराजीचे सुर उमटताना दिसत आहेत.