कुणी पाणी देतं का पाणी ? आम्ही मागत नाही लोणी आम्हाला हवंय फक्त पाणी – वडाचा कोंड ग्रामस्थांची आर्त हाक
प्रसाद गोरेगांवकर

गोरेगांव – माणगांव तालुक्यातील अंबर्ले ग्रामपंचायत हद्दीत डोंगर माथ्यावर वसलेले वडाचे कोंड हे गांव जवळपास डोंगराच्या पायथ्यापासून ७०० ते ८०० फुट उंचावर आहे.. २१ व्या शतकात देश आज प्रगती करीत असताना आणि संपुर्ण महाराष्ट्रात जलजीवन योजना राज्य सरकार राबत असताना या वडाच्या कोंड या गावातील ग्रामस्थांना आजही पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे..
वडाचे कोंड या गावात जवळपास २०० लोकांची वस्ती असून या संपुर्ण गावात एकच विहीर आहे आणि याच विहिरीतून गावातील महिला पाणी काढून रोज पिण्यासाठी वापरतात तसेच या गावातील ग्रामस्थांनी श्रमदानातून पानवठा बनवला आहे या पानवठ्यात दरवर्षी पावसाचे पाणी साचवले जाते या पाणवठ्यातील पाण्याचा वापर आंघोळीसाठी आणि पाळलेल्या गाई गुरांसाठी केला जातो परंतु विहिरीतील पाण्याने फेब्रुवारी महिन्यातच तळ गाठल्याने या ग्रामस्थांना आता नाईलाजाने या पानवठ्यातील पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा लागत आहे. त्यामुळे या ग्रामस्थांना आजरपणाला सामोरे जावे लागत आहे.
जल जीवन मिशन योजना ही भारत सरकारची योजना आहे. या योजनेचे उद्दिष्ट २०२४ पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दरडोई नळाचे पाणी नियमितपणे उपलब्ध करून देण्याचे होते असे असताना ही जल जीवन योजना अद्यापही या गावात पोचलेली नाही ही योजना फक्त कागदावरच राहिली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा योजनेचे अधिकारी या गोष्टींची दखल घेतील का? लोकप्रतिनिधी, मंत्री खासदार, आमदार या पाण्याच्या गंभीर बाबीकडे लक्ष केंद्रीत करुन वडाचे कोंड या गावात जल जीवन योजना राबवून आम्हा गावकऱ्यांची तहान भागवतील का? असे प्रश्न उपस्थित करत कोणी पाणी देतं का पाणी, आम्ही मागत नाही लोणी, आम्हाला हवंय फक्त पाणी, एक वेळ अन्न नसेल तरी चालेल पण पाण्याची सोय करावी, रोगराई पासून मुक्ती मिळावी अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त करण्यात येत आहे.