मद्यधुंद पर्यटकांकडून मारहाण प्रकरणात म्हसळा शहरातील हिंदू – मुस्लिम आणि बौद्ध समाज आक्रमक ; उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला दिले निवेदन
दिवेआगर, श्रीवर्धन, म्हसळा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक नागरीकांचा इशारा.

प्रतिनिधी – संतोष उध्दरकर ( म्हसळा ) म्हसळा तालुक्यातील घोणसे घाटामध्ये सोमवारी रात्री पर्यटनासाठी आलेल्या दोन गटामध्ये झालेल्या वादात मध्यस्ती करण्यासाठी गेलेल्या स्थानिक युवकाला मद्यधुंद पर्यटकांकडून मारहाणीची घटना घडली होती. आता या घटनेचे पडसाद म्हसळा तालुक्यात पडत असून दिवेआगर, श्रीवर्धन, म्हसळा येथे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांवर उपाय योजना करण्यासाठी म्हसळा येथील स्थानिक हिंदू – मुस्लिम आणि बौद्ध समाजाच्या नागरीकांनी पवित्रा घेत म्हसळा पोलिस प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले आहे.
पर्यटन म्हटले की, पर्यटक हे नेहमीच कोकणातील दापोली, हरिहरेश्वर, दिवेआगर, श्रीवर्धन या ठिकाणी येत असतात. गेल्या महिन्यात हरिहरेश्वर येथील घटना ताजी असताना सोम. दि. २ डिसेबर रोजी पर्यटनासाठी आलेल्या दोन गटात भांडण चालु असताना मध्यस्ती करण्यासाठी गेलेल्या सलीम घंसार यास दगडाने मारुन रक्तबंबाळ केले होते. या प्रकरणी म्हसळा हिंदू मुस्लिम आणि बौद्ध समाजाच्या प्रतिनिधी यांनी मंगळवारी सायंकाळी शासकीय विश्राम गृह येथे बैठक घेतली असता या बैठकी मध्ये म्हसळा पोलीस ठाण्यात मुद्देसूद निवेदन देण्याचे ठरले. यानंतर म्हसळा हिंदू मुस्लिम आणि बौद्ध समाज प्रतिनिधी यांनी म्हसळा पोलीस ठाणे प्रभारी कहाळे यांची भेट घेऊन निवेदन सादर करीत आरोपींवर कठोर करवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. तसेच सात दिवसात जर निवेदनाची दखल घेतली गेली नाहीतर तिव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देखील देण्यात आला आहे.
यावेळी हिंदू समाज अध्यक्ष समीर बनकर, मुस्लिम समाज अध्यक्ष नाजीम चौगले, बौद्ध समाज तर्फे संतोष जाधव, नगराध्यक्ष संजय कर्णिक, महेश पवार, सुशिल यादव, तुकाराम पाटील, निलेश मांदाडकर, हलदे तसेच सर्व प्रतिनिधी उपस्थित होते.
हिंदु, मुस्लिम, बौद्ध समाज एकत्र येऊन एकत्र बैठक घेऊन म्हसळा पोलीस ठाणे इथे निवेदन दिले आहे. त्या निवेदनाव्दारे आरोपींवर कठोर करवाई करण्यात यावी व जे तरुण शहरात बेदकरपणे मोटार सायकल चालवित आहेत त्यांच्यावर पण कारवाई करावी.
समीर बनकर
हिंदु समाज अध्यक्ष.
भांडण सोडविण्यासाठी जी व्यक्ती गेली असता त्याच्यावरच मद्यधुंद पर्यटक यांच्या कडुनच दगडाने त्याला मारहाण केली जाते व ज्या व्यक्तीला मारहाण झाली आहे ती व्यक्ती अतिदक्षता विभागात आहे. अशा घटना वारंवार होत आहेत. यावर आळा घालावा व कायदा सुव्यवस्था राखावी आणि आरोपींवर कड़क कारवाई करावी. तसेच प्रत्येक ठिकाणी सुचना फलक लावण्यात याव्यात. जर सात दिवसाच्या आत निवेदनाची दखल घेतली गेली नाहीतर आम्ही सर्वजण तिव्र आंदोलन करणार.
नाजीम चोगले
मुस्लिम समाज अध्यक्ष.