माणगांव रेल्वे स्थानक सुशोभिकरणासह होणार सज्ज
प्रवाशांना सुविधांसह मिळणार दिलासा ; सर्व रेल्वे गाड्यांना थांबे देण्याची मागणी

प्रतिनिधी – अरुण पवार ( माणगांव ) माणगाव हे रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती तालुक्याचे शहर आहे. भविष्यात माणगाव रेल्वे स्थानक हे जंक्शन स्थानक म्हणून ओळखले जाणार आहे. कोकण रेल्वेने विविध महत्त्वाच्या स्थानकांचे सुशोभीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये माणगाव रेल्वे स्थानकाचा समावेश असून हे रेल्वे स्थानक सुशोभीकरणासह सज्ज करण्यात येत आहे. त्याचबरोबरीने या स्थानकामध्ये अत्याधुनिक विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याने रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र या रेल्वे स्थानकात सर्व प्रकारच्या रेल्वे गाड्यांना थांबे देण्याची मागणी प्रवाशी संघटनेनी केली आहे.
१९९२ या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांच्या हस्ते या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल ३२ वर्षांनी माणगाव रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. माणगाव हे पनवेल वगळता शहरातील मध्यवर्ती ठिकाणी रेल्वे स्थानक आहे. महत्वाकांक्षी दिघी बंदर मंजूर झाले आहे. भविष्यात दिघी ते माणगाव रेल्वे होणार आहे. रायगड जिल्ह्याच्या मध्यवर्ती माणगाव असल्याने भविष्यात हे स्थानक जंक्शन होणार आहे. त्यामुळे येथील सर्व प्रकारच्या सुविधा विकसित करण्यात येत आहेत. त्याचा मोठा फायदा रेल्वे प्रवाशांना मिळणार आहे असे सांगण्यात येत आहे.
माणगांव रेल्वेस्थानकाच्या रस्ता काँक्रिटीकरण आणि सुशोभिककरण करणे या कामाचे ऑनलाईन भूमिपुजन दि. ८ ऑगस्ट २०२४ रोजी संपन्न झाला होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे हे ऑनलाईन सहभागी झाले होते.
माणगांव स्थानकाचे सुशोभिकरण करून प्रवाशांना थांबण्यासाठी आधुनिक कॅनॉपी शेड, आसन व्यवस्थेसह व पोच मार्गाचा काँक्रिट रस्ता, फुटपाथ, पार्कींग व्यवस्था इ. बाबींसह सुसज्ज स्थानक बनविण्यात येणार आहे. तसेच या रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी दुचाकी, रिक्षा व चार चाकी वाहनांकरीता प्रशस्त पार्किंग, आकर्षक बगीचा व आधुनिक स्त्री व पुरूष स्वच्छतागृह, शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणार आहे मात्र माणगाव रेल्वे स्थानकात कोकण रेल्वेच्या बहुतेक गाड्या थांबत नाहीत. त्यामुळे माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, तळा या तालुक्यातील रेल्वे प्रवाशांची अंत्यंत गैरसोय होत आहे. याबाबत विविध लोकप्रतिनिधी आणि कोकण रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करूनही काहीच उपयोग झाला नाही तसेच आंदोलन केले. परंतु सर्व प्रकारच्या रेल्वे गाड्या थांबत नाही. या गाड्या थांबल्यास खऱ्या अर्थाने संपूर्ण श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाला लाभ होणार आहे असे प्रवासी संघटनेकडून सांगण्यात आले. यासाठी खासदार सुनील तटकरे आणि महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी करण्यात येत आहे.