तालुक्यात पुष्पा गँग सक्रिय; कात बनवण्यासाठी खैराच्या लाकडाची तस्करी
वनविभाग आणि पोलिसांच्या आशिर्वादाने चोरटी वाहतुक

गोरेगाव (विशेष प्रतिनिधी) तालुक्यातील जंगलातून मोठ्या प्रमाणावर खैराच्या झाडांची तोड होत असताना वन विभागाकडून जाणिवपुर्क दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. तालुक्यातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात खैराची झाडे आहेत. खैराचे अनेक उपयोग आहेत. खैराच्या झाडापासून गुटख्यासाठी लागणारा खैर आणि रसायन भुट्टी बनवण्यात येत असल्याने त्याला जास्त मागणी आहे. नेमके हेच वैशिष्ट्य हे खैर तस्करांनी खैराच्या झाडांकडे आपला मोर्चा वळवला असून रात्रीच्या वेळी जंगलातून मोठ्या प्रमाणावर खैराच्या झाडांची तोड करून तस्करी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
तालुक्यातील अनेक गांवामधून अवैधपणे खैराची तोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामध्ये खरवली, आमरोली, निलगुण, बामणोली, निजामपुर, भाल, विळे, पाटणुस भिन्नाड, भांडीवली, कुशेडे, तारणे, शिरवली, उणेगांव चापडी, मुगवली, गारळ, तळा, साई, काकल पन्हळघर, अंबर्ले, वाघोसे, मांगरुळ विभागातून मोठ्या प्रमाणात तोड होत असल्याची माहिती मिळते.
या खैर तस्करांकडून पुरावे नष्ट करण्यासाठी खैराचे झाड कापून झाले की, खोड मुळासकट नष्ट केला जात आहे. विशेष म्हणजे वनविभागाची सुरक्षा रक्षक, कर्मचारी आणि पोलिस चौकी असतानाही खैराची लाकडे बाहेर कशी जातात असा प्रश्न उपस्थित केला जात असताना वनविभागाच्या आणि पोलिसांच्या संगनमताने हा प्रकार सुरू असल्याचे स्थानिकांकडून थेट आरोप होत आहे.