
गोरेगांव – माणगाव तालुक्यातील दहिवली येथे महिलांनी शिवणकामाचे युनिट सुरु केले आहे. या युनिटचा शुभारंभ दिनांक २१ जानेवारी रोजी समाजातील प्रतिष्ठित महिला, पंचक्रोशीतील शिवणकाम करू इच्छिणाऱ्या महिलांनी कोकणी तानाबाना सेंटरला भेट देत करण्यात आला. तालुक्यात महिला उद्योजक तयार व्हाव्यात यासाठी सेवा इंटरनॅशनल संस्थेच्या मदतीने ओरॅकल कंपनीने पुढाकार घेतला आहे.
तालुक्यात शिवणकामाचे युनिट चालु होण्यासाठी माणगावमधील व्यापारी, महिला बचत गट व पोस्को कंपनीने वेळोवेळी खूप मदत केली असून आज खेडेगावातील महिला प्रशिक्षण घेऊन अद्यावत मशीनवर कापडी पिशव्या शिवत एक नवीन ओळख निर्माण करत आहेत. पुण्याहून अमिता मिशी, अर्चना जोशी यांनी युनिट उभे राहण्यासाठी कष्ट घेतले आहेत तसेच माणगाव तालुक्यातील कुलदीप पुरंदरे, आसावरी काळे, तेजस गांधी, डॉ. रश्मी वरखंडकर, गणेश खातू, संदीप घाग, तेजस गांधी, भोस्तेकर कुटुंब यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
या युनिटच्या माध्यमातून महिलांनी बनविलेले सुंदर बटवे, कापडी पिशव्या व इतर वस्तू सेंटरला भेट देणाऱ्या लोकांनी यावेळी खरेदी केल्या. या शुभारंभा प्रसंगी टी एस भोस्तेकर विद्यालयाने युनिटसाठी जागा देऊन दहिवलीमध्ये महिलांच्या उन्नतीच्या संधी निर्माण केल्या असे अमिता मिशी यांनी सांगितले. प्लास्टिक पिशव्या ऐवजी कापडी पिशव्या लोक वापरत आहेत, त्यांना रास्त दरात पिशव्या उपलब्ध करत आहोत असे कोकणी तानाबाना प्रमुख साक्षी म्हाप्रळकर यांनी आवर्जून सांगितले.