
प्रतिनिधी – अरुण पवार ( माणगाव ) माणगाव शहरातून बाराही महिने वाहणारी आणि माणगाव तालुक्यातील वरदायिनी म्हणून ओळख असलेली काळ नदीचे पाणी प्रदुषित झाले आहे. या नदीच्या पात्रात कचरा टाकला जात आहे. सांडपाणी सोडण्यात येत आहे. मातीच्या भरावयाची माती टाकल्यामुळे लालसर तवंग आलेला आहे. त्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांत नदी किनारी बेकायदेशीरपणे इमारती, बंगले आणि घरे बांधण्यात आलेली आहेत. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार नदी किनार्यापासून १०० मिटर अंतरात कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येत नाही. तरीही नदी किनार्यालगत बेकायदेशीर बांधकामे सुरूच आहेत. त्यामुळे कचरा आणि मोठमोठ्या इमारतीचे सांडपाणी काळ नदीपात्रात बिनदिक्कत सोडण्यात आले आहे. तसेच शौचालयाचे मलमूत्र सोडण्यात आल्याने काळ नदी दुषित झाली आहे. १९९५ मध्ये दुषित पाण्यामुळे माणगाव शहरात काविळीची साथ येऊन त्यात तीन जण दगावले होते. हे दुषित पाणी माणगाव शहरातील भादाव, उतेखोल, खांदाड, जूने माणगाव आणि नदी काठावरील गोरेगाव सहीत सुमारे ५० गावांपर्यंत पोहचत असल्याने त्यांच्याही आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. माणगाव नगरपंचायतीमध्ये पाणी शुद्ध करण्यासाठी जल शुद्धीकरण केंद्र सुरू असल्याने किमान शुद्ध पाणी मिळत आहे. मात्र नदी किनारी असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये जल शुद्धीकरण केंद्र अस्तित्वातच नसल्याने तेथे नदीचे दुषित पाणी थेट गावात आणि घरात जात आहे. त्यामुळे तेथील नागरिक विविध प्रकारच्या आजारांना नाहक बळी पडत आहेत.
गेल्या पाच वर्षांपासून काळ नदीवर शहरातील मुंबई गोवा महामार्ग पुल, उतेखोल कोकण रेल्वे पुल आणि उतेखोल आदीवासी वाडी जवळील मुंबई गोवा महामार्ग बायपास पुल अशा तीन पुलांची कामे सुरू आहेत. त्यांनी बांधकाम करताना वापरलेले बांधकाम साहित्य, माती, डबर, खडी, सिमेंट आदी साहित्य काळ नदी पाणी पात्रात मिसळल्याने काळ नदी प्रदूषित झाली आहे. पाणी गढूळ होऊन नदीच्या पाण्यावर लालसर तवंग आलेला आहे. त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी योग्य राहिलेले नाही असे नागरिकांनी आरोप केला आहे.
पाच वर्षांपूर्वी काळ नदीच्या जलप्रदूषणाबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर महाड येथील प्रदुषण नियंत्रण कार्यालयाने नदी काठावरील इमारतींचे बेकायदेशीरपणे सोडलेले सांडपाणी बंद करण्यात यावे असे आदेश दिले होते. त्यामुळे ते बंद केले होते. आता तीन पुलांच्या कामांची माती, नदीत कचरा बेदरकारपणे फेकण्याची वृत्ती, कपडे,भांडी, गाड्या, जनावरे नदीत धुणे यामुळे काळ नदी अधिक प्रदूषित होत आहे. त्यामुळे कधीकधी मासेही मरत असतात.
याबाबत नगरपंचायत मध्ये विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, माणगाव शहराला जल शुद्धीकरण केंद्रामार्फत स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरवठा केला जात आहे. कोणत्याही इमारतीचे सांडपाणी नदीत सोडण्यात आलेले नाही. काळ नदी प्रदूषित करणार्या वर कठोर कारवाई करण्यात येईल.