मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची तांत्रिक पडताळणी सुरू; अर्ज मंजुरीमध्ये रायगड जिल्हा आघाडीवर

रायगड (प्रतिनिधी ) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला’ रायगड जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात योजनेचा लाभ देण्यासाठी तांत्रिक पडताळणी सुरू करण्यात आली आहे. आज महसूल पंधरवड्याअंतर्गत पहिला दिवस माझी बहीण लाडकी बहीण योजनेसाठी होता. आज अखेरपर्यंत जिल्ह्यात 1 लाख 33 हजार अर्ज मंजूर करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यात या योजनेसाठी आज अखेरपर्यंत 3 लाख 45 हजार 734 पात्र महिलांनी अर्ज केले आहेत. तालुका स्तरावर शिबीरे घेऊन पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत आणि महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे यांनी वेळोवेळी आढावा घेऊन प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले होते.
प्राप्त अर्जाची छाननी करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात छाननी कक्ष स्थापन केलेला आहे. तिन शिफ्ट मध्ये निर्धारित निकषानुसार अर्ज छाननी, अंतिम करण्याच्या कार्यपध्दतीनुसार काम सुरु आहे. उर्वरीत ऑनलाईन प्राप्त अर्जावर तालुकानिहाय कार्यवाही सुरु आहे. नव्याने प्राप्त होणारे ऑफलाईन अर्ज ऑनलाईन करण्याचे काम गावपातळीवर सुरु असुन पात्र लाभार्थी यांना लाभ मंजूरी करण्याबाबतही कार्यवाही सुरु आहे.
दिनांक १ ऑगस्ट २०२४ पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळ (पोर्टल) सुरु करण्यात आलेले आहे.
“या योजनेद्वारे अर्ज सादर केलेल्या निवडक पात्र महिला अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यात येत आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी एक रुपया जमा करण्यात येत आहे.
ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे. हा एक तांत्रिक प्रक्रियेचा भाग असून याबद्दल कुठलाही प्रक्रियेचा गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका “असेही मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.