भिरा येथील टाटा विद्युत प्रकल्प माणगाव व मुंबईसाठी ठरले वरदान
प्रतिनिधी - अरुण पवार ( माणगांव )

माणगाव – माणगाव तालुक्यातील भिरा आणि पाटणूस येथे स्वातंत्र्य पूर्व काळात म्हणजे १९२७ या वर्षी टाटा विद्युत प्रकल्प धरण बांधण्यात आले. पहिल्या महायुद्धानंतर मुंबई आणि बृहन्मुंबई या उपनगरांसाठी वीजेची कमतरता भासू लागली. त्यावेळी जमशेटजी टाटा यांनी दुरदृष्टी समोर ठेवून १९१७ मध्ये मुंबईच्या जवळच असलेल्या खोपोली आणि कर्जत येथे टाटा विद्युत प्रकल्प ब्रिटिशांची मंजुरी घेऊन सुरू केले. त्यानंतर १९२७ मध्ये माणगाव तालुक्यातील माणगाव पासून १५ किलोमीटर तर मुंबई येथून १५० किलोमीटर अंतरावर असलेल्या भिरा आणि पाटणूस येथे टाटा विद्युत प्रकल्प धरण बांधण्यात आले. हे तिन्ही प्रकल्प मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील गावांना वरदान ठरले आहेत.
पहिल्या महायुद्धानंतर मुंबई आणि बृहन्मुंबई येथील उपनगरांना वीजेची चणचण भासत होती. मुंबईतील औद्योगिक कारखाने आणि कंपन्या यांच्या बरोबरच वसाहती झपाट्याने वाढत होत्या. तत्कालीन मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड विलिंगटन आणि या सर्वांनाच वीजेची गरज भासत होती. हे लक्षात घेऊन जमशेटजी टाटा यांनी रायगड जिल्ह्यात खोपोली, कर्जत आणि माणगाव येथील विद्यूत प्रकल्पांची उभारणी करुन निर्मिती केली. आजही हे विद्युत प्रकल्प वरदान ठरत आहेत. टाटांनी १० वर्षांत वीज सुरू केला. मात्र शेजारी असलेला कुंभे जलविद्युत प्रकल्प ५० वर्ष रखडलेल्या अवस्थेत आहे.
मुंबईमध्ये बॉम्बे इलेक्ट्रीक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट ( BEST ) हि कंपनी वीज पुरवठा निरंतर आणि अखंडीतपणे करीत आहे. मुंबईत नैसर्गिक आपत्ती वगळता कधीही वीज खंडित झाली नाही हे विशेष आहे. मात्र रायगड जिल्ह्यात टाटांची वीज नाही तर महावितरण महामंडळाची वीज आहे. ती किती वेळा खंडित होते याचा अनुभव घेत आहेत. नियमित आणि अखंडितपणे वीज प्रवाह सुरू ठेवणे हेच टाटा पावरच्या यशाचे गमक आहे. ग्राहकांना आणि आपल्या भारतीयांना जे जे चांगले आणि उत्तम देता येईल तेवढे देण्यासाठी ते नेहमीच सतर्क आणि प्रयत्नशील असतात हे सिद्ध होते.
पूणे जिल्ह्यातील मुळशी येथील मुळा आणि निला या नद्या धरणाला मिळतात. त्या धरणाचे पाणी सह्याद्रीच्या कुशीत निसर्गरम्य परिसरातील भिरा आणि पाटणूस येथे वीज प्रकल्पात वळवून वीज निर्मिती सातत्याने केली जात आहे. या वीज प्रकल्पात ३०० एम. डब्ल्यू. क्षमतेने वीज तयार करून ९५२.८३ जी. डब्ल्यू. एच. इतकी वीजनिर्मिती केली जाते. तर २५.७ एम.डब्ल्यू. नेमप्लेट कार्यक्षमता आहे. ही वीज हायड्रॉलिक होल्डिंग्स कँपैन करुन निर्मिती केली जाते. जनरेशन, ट्रान्सलेशन, डिस्ट्रिब्युशन यावर हा प्रकल्प सुरू आहे. बृहन्मुंबईला सप्लाय, ट्रान्सपोर्ट आणि पर्चेस यावर आधारित वीज दिली जाते. या वीज प्रकल्पात १३०० पेक्षा जास्त कामगार आणि अधिकारी कार्यरत आहेत. तसेच अप्रत्यक्षपणे हजारो बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या वीज प्रकल्पात वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर केला जातो. त्यामुळे हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. हे पाणी काळ आणि कुंडलिका नदीला मिळते. त्या पाण्यावर माणगाव आणि रोहा तालुक्याच्या आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी भातशेती, भाजीपाला, कडधान्ये, फळफळावळ करुन आपली उपजीविका करतात. सध्या या पाण्याच्या प्रवाहावर बोटींग रपलिंग केली जाते. त्यामुळे रोजगार निर्मिती झाली आहे.
१९२७ मध्ये निर्माण झालेल्या या वीजनिर्मितीला २०२७ ला १०० वर्षे पूर्ण होतील. तेव्हाही टाटा या दानशूराचे नाव आदराने घेतले जाईल. त्यामुळे हा प्रकल्प वरदान ठरत आहे. टाटांच्या स्मृती चिरंतन स्मरणात राहतील. येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घरे, दवाखाना, सुपर मार्केट, बँक, इंग्रजी माध्यमाची शाळा, भव्य मैदान, एटीएम, बंगले, मोठे गार्डन, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, बस, स्विमिंग पूल आदी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अशी विविध प्रकारची काळजी घेण्यात आली आहे. या सर्व सुविधा अल्प दरात उपलब्ध करून त्यांना समाधानी केले आहे.