मा. सैनिक सुरेंद्र ठाकूर महसूल विभागाची उत्कृष्ट सेवा बजावून सेवानिवृत्त
भारतीय सैन्य दलात १७ वर्षे व महसूल विभागात १६ वर्षे; ३३ वर्षांची प्रदीर्घ सेवा

प्रतिनिधी – किरण बांधणकर (पेण) पेण महसूल विभागातील मंडळ अधिकारी तथा माजी सैनिक सुरेंद्र मधुकर ठाकूर यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम पेण तहसील कार्यालयात संपन्न झाला.
मा. सैनिक सुरेंद्र ठाकूर यांचे मूळ गाव काळेश्री असुन त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९६६ रोजी झाला. १९८२ साली १० वी झाल्यानंतर १९८४ मध्ये भारतीय सैन्य दलात ते भरती झाले. सिकंदराबाद, अरुणाचल प्रदेश, सिक्किम, जोधपूर, दिल्ली, देहराईन, पुणे, काश्मीर अशा अनेक ठिकाणी त्यांची पोस्टींंग झाली होती. १९९९ मध्ये झालेल्या कारगिल वॉर मध्ये देखील ठाकूर यांचा सहभाग होता त्यावेळी त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. त्यानंतर सैन्य दलात १७ वर्षे प्रमाणिक सेवा देवून मे २००१ मध्ये भारतीय सैन्य दलातून सेवा निवृत्त झाले. सैन्य दलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी सोल्जर सिक्युरिटी सर्व्हिस स्थापन केली तसेच त्यांनी काही काळ औद्योगिक क्षेत्रात हायकल तळोजा आणि भूषण स्टील खोपोली येथे काम केले. योगायोगाने जून २००८ मध्ये राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या तलाठी या पदावर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. यावेळी प्रथम कांदळे सजा नंतर कामार्ली, बोरगाव, पेण नंतर वरसई, निधवली त्यानंतर वढाव सजेचा अतिरिक्त कार्यभार त्यांनी सांभाळला. २०२२ मध्ये या पदावरून पदोन्नती होवून सुरेंद्र ठाकूर मंडळ अधिकारी झाले.
भारतीय सैन्य दलात १७ वर्षे आणि राज्य शासनाच्या सेवेत १६ वर्षे अशी एकूण ३३ वर्षे प्रदीर्घ सेवा बजावून ३१ ऑगस्ट २०२४ रोजी महसूल विभागाच्या मंडळ अधिकारी पदावरून प्रामाणिक सेवा बजावून सेवानिवृत्त झाले. महसुल विभागाकडून त्यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पेणचे तहसिलदार तानाजी शेजाळ, नायब तहसिलदार प्रसाद कालेकर, नितीन परदेशी, पंचायत समितीचे प्रसाद पाटील, सर्व सजा तलाठी, माजी सैनिक, महसूल विभागाचे कर्मचारी आणि पत्रकार यावेळी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे मनोगत झाले त्यानंतर पेण तालुका माजी सैनिक सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी सुरेंद्र ठाकूर यांची मिरवणूक काढून त्यांचे अभिनंदन केले.