वीर यशवंतराव घाडगे यांच्या जयंती निमित्ताने

व्हिक्टोरिया क्रॉस पदक विजेते वीर यशवंतराव घाडगे यांचे इटलीत स्मारक !
हिटलर आणि मुसोलिनी सैन्यावर मिळवला विजय !
भारतीय योध्द्यांमध्ये असामान्य साहस आणि धाडस दिसून येत असते. आपले असामान्य शूर सैनिक हे बाहेरच्या आक्रमक राजांच्या गादीसाठी आपले शौर्य पणाला लावत असत. सैनिकांमधील शौर्य, धाडस, कौशल्य हे आपल्या देव, देश आणि धर्मासाठी कसे वापरायचे याचा उत्तम वस्तुपाठ छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने महाराष्ट्राला व देशाला लाभला. शिवाजी महाराजांचे मावळे म्हणजे नुसतेच लेफ्ट राईट करणाऱ्या फौजेतील सैनिक नव्हते. प्रत्येक मावळा हा युद्धभूमीवर येणाऱ्या प्रसंगात स्थळ, स्थिती, निकड पाहून चपळाईने निर्णय घेणारा स्वयंभू सेनाधिकारीच होता. याच प्रकारे घडलेल्या एका मराठी सैनिकाचे कर्तृत्व आणि त्याचा विदेशात नुकताच झालेला सन्मान हा सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे.
अवघ्या २२ व्या वर्षी वीर मरण
दुसऱ्या महायुद्धात भारतीय सैन्याने इटलीमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावली होती. हिटलरच्या अत्याचारी नाझी सैन्यापासून इटलीला मुक्त करण्याच्या लढाईत सुमारे ५० हजारपेक्षा अधिक भारतीय सैनिकांनी भाग घेतला होता. भारतीय सैन्यदलाच्या ५ व्या मराठा लाईट इन्फट्रीच्या नाईक यशवंत घाडगे यांनी १० जुलै १९४४ रोजी झालेल्या तुंबळ लढाईत अत्यंत अतुलनीय असा पराक्रम दाखविला. येथील अप्पर टायबर व्हॅलीच्या पर्वत रांगांमधील लढाईत आपले सहकारी धारातीर्थी पडत असतांना, त्यांनी सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. या निकराच्या लढाईत विजय मिळाला तरी रायगड जिल्ह्यातील माणगाव जवळील पळसगाव – आंब्रे वाडी येथील यशवंत घाडगे यांना अवघ्या २२ व्या वर्षी वीरमरण आले. त्यांनी केलेल्या या पराक्रमाबद्दल त्यांना बिटिशांचा व्हिक्टोरिया क्रॉस हा सर्वोच्च बहुमान देण्यात आला.
भारतीय सैनिकांच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करत इटलीमधील कम्युन ऑफ मोनोटोन आणि इटालियन लष्करी इतिहासकारांनी, इटलीतील पेरुगियामधील मॉन्टोन येथे उभारण्यात आलेल्या “व्ही.सी. यशवंत घाडगे सनडायल मेमोरियल” चे अनावरण केले. दुसऱ्या महायुद्धात इटालियन मोहिमेदरम्यान लढलेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसेच अप्पर टायबर व्हॅलीच्या पर्वत रांगांमध्ये लढताना शहीद झालेले व्हिक्टोरिया क्रॉस पदक विजेते नायक यशवंत घाडगे यांना आदरांजली म्हणून हे स्मारक उभारण्यात आले आहे. इटलीत नुकत्याच झालेल्या या कृतज्ञता सोहोळ्यात उभारलेले ” सूर्य घड्याळ ” हा एक अभिनव प्रकार आहे. या सूर्य तबकडीवर नाईक यशवंत घाडगे यांच्या नावासह त्यांच्या बलिदानाच्या १० जुलै या दिवसाचे विशेष महत्व अधोरेखित केले गेले आहे. या स्मारकाचे ब्रीदवाक्य “ओमिन्स सब इओडेम सोल” असे असून ज्याचा अर्थ “आपण सर्व एकाच सूर्याच्या प्रकाशात राहतो” असा होतो. येथे भारतीय सेनेचे बोधचिह्ण देखील दिमाखात झळकत आहे. या कार्यक्रमाला इटलीतील भारतीय राजदूत डॉ. नीना मल्होत्रा, भारतीय कर्नल व्ही.एस. सलारिया, मराठा लाईट इन्फट्रीचे प्रतिनिधी, त्या देशाचे तसेच अन्य देशांचे उच्च सेनाधिकारी या विशेष कार्यक्रमाला उपस्थित होते.
या निमित्ताने तेथे एका विशेष टपाल पाकिटाचे अनावरणही करण्यात आले. या पाकिटावर नायक यशवंत घाडगे यांचे व व्हिक्टोरिया क्रॉसचे छायाचित्र छापण्यात आले असून या स्मारकाच्या पूर्ण नावाचा उल्लेख आहे. याआधी २००६ मध्ये सेंट व्हिन्सेंट या देशाने नाईक यशवंत घाडगे यांच्या सन्मानार्थ, त्यांच्या छायाचित्राचे एक टपाल तिकीट प्रसारित केले. मात्र हि बातमी दुर्दैवाने कोणत्याही वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली नाही अशी माहिती भारतीय सैन्य अभ्यासक मकरंद करंदीकर यांनी दिली.
आपल्या स्वातंत्र्यदिनी आपण आपल्या सैनिकांची कृतज्ञतेने आठवण काढतो. तरीही लाखो सैनिक ” नाही चिरा, नाही पणती ” असे अज्ञातच राहतात. विदेशांनी केलेल्या सन्मानाच्या निमित्ताने नाईक यशवंत घाडगे यांच्यासह लाखो अज्ञात सैनिकांना कृतज्ञ अभिवादन !
अरुण पवार,
माणगाव – रायगड