काळ व गोद नदीवरील पूलाचे बांधकाम संथगतीने
अपुर्ण कामामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या कायम

प्रतिनिधी – अरुण पवार ( माणगाव ) माणगाव शहरातील काळ व गोद नदीवरील तसेच बायपास पूलाचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने वारंवार प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या पुलाचे बांधकाम गेली ५ वर्षे कासवगतीने सुरू आहे. मध्यंतरीच्या काळात हे काम निधी अभावी रखडले होते. दरम्यान मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण तातडीने पूर्ण करण्यासाठी बेमुदत आमरण उपोषणाला विविध संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. त्यामुळे या महामार्गाचे आणि या पुलाचे काम सुरू झाले आहे परंतु या कामाला गती नसल्याने वाहतुक कोंडीची समस्या जाणवत आहे.
माणगाव शहरातील काळ नदीवरील पूल हा अरुंद असल्याने तसेच शहरातील बाजारपेठ मधून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण अद्यापही झालेले नाही. त्यामुळे वाहतुकीची कोंडी वाढतच चालली आहे. तसेच बाजारपेठेतील अतिक्रमणे हटविण्यासाठी महामार्ग कार्यालयाने व्यावसायिकांना अनेक वेळा नोटीसा बजावल्या होत्या. मात्र अतिक्रमणे हटविली नसल्याने पादचाऱ्यांना चालणे देखील अवघड होऊन बसले आहे.
काळ नदीवरील पूल हा इंग्रजी राजवटीत १८७१ साली बांधण्यात आला आहे. त्यानंतर माजी आमदार अशोक दादा साबळे यांच्या पाठपुराव्यामुळे २००५ मध्ये या पुलाची डागडुजी करून ६ फुटांचे रुंदीकरण करण्यात आले. या पुलाला १५३ वर्षे पूर्ण झाली आहेत. तरी हा पुल अजूनही भक्कमपणे उभा आहे असे सार्वजनिक बांधकाम विभागाने जाहीर केले होते.
नवीन पुलाचे बांधकाम २०१९ पासून सुरू झाले असून ५ वर्षे पूर्ण झाली तरी हे काम अर्धवट स्थितीत असल्याने गेली अनेक वर्षे दर शनिवार रविवारी प्रवाशांची २-३ तास रखडपट्टी होत असतानाचे चित्र पहायला मिळत असते याबाबत खासदार सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे आणि आमदार भरत शेठ गोगावले यांनी काळ नदीवरील पुल आणि महामार्ग या वर्षभरात पूर्ण होईल असे आश्वासन दिले आहे. मात्र हे काम पूर्ण करण्यासाठी अजून कमीत कमी दोन वर्षे लागतील असे सांगण्यात येत आहे.