माणगावमध्ये ख्यातनाम शिवशाहीर विजय तनपुरे यांच्या शिवगर्जना कार्यक्रमाचे आयोजन…
प्रतिनिधी - सचिन पवार ( माणगांव - रायगड )

माणगांव : मराठा कर्मचारी मित्रमंडळ, माणगाव रायगडच्या वतीने सालाबाद प्रमाणे बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी हिंदवी स्वराज्य संस्थापक,रयतेचे राजे ,युगप्रवर्तक व चारित्र्यसंपन्न छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अशोकदादा साबळे विद्यालय, माणगाव या ठिकाणी सायंकाळी ठीक साडेसात वाजता साजरी होणार आहे.या वर्षी शिवजन्मोत्सवानिमित्त आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिवशाहीर विजय तनपुरे,राहुरी, अहिल्यानगर यांचा संपूर्ण महाराष्ट्राने गौरविलेला अनेक पुरस्कार प्राप्त अस्सल मराठी कार्यक्रम शिवगर्जना आयोजित करण्यात आला आहे.मराठा कर्मचारी मित्रमंडळ, माणगाव मध्ये गेल्या 19 वर्षापासून शिवजयंती साजरी करीत आहेत.आतापर्यंत शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्रातील अनेक ख्यातनाम शिवव्याख्याते जसे नितीन बानगुडे पाटील, प्रशांत देशमुख, शिवरत्न शेट्टे, निलेश जगताप, शिवशाहीर संतोष साळुंखे, ऍड.यादव , ह.भ.प.रोहिदास हांडे महाराज हे माणगाव मध्ये येऊन गेलेले आहेत.
यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्र राज्याचे मंत्री माननीय नामदार श्री.भरत शेठ गोगावले साहेब रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खार जमीन विकास मंत्री, माननीय नामदार कु. आदितीताई तटकरे महिला व बालविकास मंत्री,महाराष्ट्र राज्य व राज्यसभा खासदार धैर्यशील दादा पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे. यासाठी मंडळाच्या वतीने माणगाव तालुक्यातील सर्वपक्षीय नेते मंडळींना निमंत्रित करण्यात आले आहेत. कार्यक्रमाची जय्यत तयारी मंडळाचे सर्व पदाधिकारी करत आहेत. स्वराज्याची राजधानी रायगडच्या भूमीत साजरी होणारी ही जयंती उत्तरोत्तर लक्षवेधी ठरत आहे. गेल्या अनेक वर्षापासून माणगावकरांना यानिमित्त एक आगळीवेगळी शिवविचाराची मेजवानी ऐकायला मिळणार आहे. माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्वेसर्वा ॲड. राजीवजी साबळे हे आपल्या विद्यालयाचे रंगमंच व क्रीडांगण उपलब्ध करून देत असतात.माणगावकरांनी मोठ्या संख्येने कुटुंबीयांसह उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा ,असे आवाहन मराठा कर्मचारी मित्रमंडळाचे मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डी.एम.जाधव सर व शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष श्री प्रमोद देशमुख तसेच सर्व पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.