रायझिंग डे निमित्त तळा ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पोलीस कामकाजाची दिली माहिती
प्रतिनिधी - किशोर पितळे ( तळा )

तळा – २ जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस स्थापन दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ‘रायझिंग डे’ हा सप्ताह पोलिसांच्या वतीने आयोजित केला जातो. या सप्ताहात विद्यार्थ्यांना कायदेविषयक आणि स्वरक्षणाविषयक माहिती देऊन जनजागृती करण्याचा मानस असतो. रायझिंग डे च्या निमित्ताने तळा पोलीस ठाण्यात कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना नुकतेच बोलावून पोलीस ठाण्यातील रचना, कार्यपध्दती, कामकाज, तक्रार निवारण करण्याची पध्दत व शस्त्रास्त्र याविषयी माहिती देण्यात आली.
तळा पोलीस ठाणेचे पोलीस उप निरीक्षक सतीश गवई यांनी आपल्या कायदा सुव्यवस्थेबाबत माहिती दिली. कुठलेही हत्यार बाळगणे हा गुन्हा आहे. यासाठी नियमाने कुठल्याही हत्यारासाठी परवानगी आवश्यक आहे. पोलीस ठाण्यात जी हत्यारे असतात त्यांचा परिस्थिती पाहूनच वापर करावा लागतो. प्रथम लाठीचार्ज केव्हा केला जातो? अश्रुधूर व फायरींग केव्हा केली जाते? याविषयी माहिती दिली.पोलीस व नागरीक आणि उद्याचे भविष्य घडविणारे विद्यार्थी यांना पोलीस ठाणे कसे काम करते तसेच पोलिसांचे व आपले संबंध अधिक मजबूत कसे होतील यासाठी आजचा दिवस महत्वाचा असल्याचे सतीश गवई यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी पोलीस, सैनिक, नेव्ही, स्पर्धा परीक्षा आदी क्षेत्रांत करिअर करावे, १८ वर्षाखालील विद्यार्थ्यानी कोणतेही वाहन चालवू नये, मोबाईलच्या रिल्स पाहण्यात वेळ घालवू नये व कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मिलिंद फाटक यांनी ठाणे अंमलदार टेबल,सचिन सोन कांबळे यांनी रायटर कक्ष, विष्णू तिडके यांनी गोपनीय कक्ष, कुंदन जाधव यांनी वायरलेस सेट, पूजा साळुंखे यांनी ऑनलाईन तक्रार संदर्भात माहिती दिली. शाळा समितीचे चेअरमन महेंद्रशेठ कजबजे यांनी विध्यार्थ्यांना पोलीस ठाणेच्या कामकाजाबाबत माहिती दिल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई व सर्व पोलीस बांधवांचे आभार मानले. याप्रसंगी ज्युनियर कॉलेजचे शिक्षक प्रतिनिधी प्रा द्याणेकर बी एन,प्रा कसबे पी,प्रा.गायकवाड पी एम, प्रा गायकवाड एल आर, प्रा आंबेगावे डी टी आदी शिक्षक, पोलीस बांधव व विद्यार्थी उपस्थित होते.