
पेण – राज्य सरकारने राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसचे १५ टक्के भाडेवाढ केल्यामुळे आता प्रवाशांसोबत राजकीय पक्ष देखील आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. पेण परिवहन मध्यवर्ती बस स्थानकासमोर एसटी बस आडवत ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी चक्काजाम आंदोलन केले आहे. यावेळी काहीकाळ बस देखील शिवसैनिकांनी रोखून धरल्या होत्या. तात्काळ भाडेवाढ निर्णय रद्द करावा, अशी मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली आहे.
एसटी भाडेवाढ विरोधात ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून, ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पेण शहरातील विभागीय मध्यवर्ती बस स्थानकासमोर चक्काजाम आंदोलन करण्यात आले असून पेण विभागीय कार्यालयीन अधिकारी यांस निवेदन दिले. यावेळी जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे व संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी भाडेवाढ रद्द करा अन्यथा जनतेला न्याय मिळेपर्यंत आंदोलन करू असा इशारा पेण विभागीय परिवहन अधिकारी यांना दिला, आज जसे प्रवास भाडे वाढवले तसेच पुढे सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव देखील हे सरकार वाढवणार, फसवी आश्वासने देवून निवडणुका लढवलित, दिलेली आश्वासने पूर्ण करून राज्य चालवणे शक्य नाही हे निदर्शनास आल्यानंतर आता भाडेवाढ करून सामान्य जनतेला हा भुर्दंड देण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. आम्ही शिवसैनिक कधीच हे होवून देणार नाही असे देखील ते म्हणाले.
यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, युवा जिल्हा अधिकारी अमिर (पिंट्या) ठाकुर, जिल्हा समन्वयक नरेश गावंड, जिल्हा सल्लागार सतीश पाटील, समीर म्हात्रे, तालुका प्रमुख जगदीश ठाकुर, तालुका प्रमुख मुरुड नवशाद दळवी, महिला जिल्हा संघटिका दिपश्री पोटफोडे, विभाग प्रमुख मारुती भगत, गिरीश शेळके, प्रकाश पाटील, योगेश जुईकर, शशी गावंड, राकेश मोकल, योगेश पाटील, अचुत पाटिल, मेघना चव्हाण, वैशाली समेळ, दर्शना जवके, महानंदा तांडेल, वसंत म्हात्रे, हिराजी चौगुले आदी शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.