
प्रतिनिधी – अरुण पवार ( माणगांव ) माणगाव येथील शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या गणेश यशवंत वाघरे इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी सार्थक महामुणकरने वर्सोवा, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या विभागीय शालेय तिरंदाजी स्पर्धेत अचूक सुवर्ण वेध साधत सुवर्ण पदक मिळवून उज्वल यश मिळवले आहे. त्यामुळे सार्थक या खेळाडूंची निवड पूणे येथील होणाऱ्या राज्य पातळीवरील स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.
गुरुवार दिनांक ३० जानेवारी रोजी वर्सोवा मुंबई येथे मुंबई, कोकण, विदर्भ, मराठवाडा, पूणे या पाच विभागांतील तिरंदाजी विभागीय पातळीवर चुरशीच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत माणगाव शहरातील गणेश यशवंत वाघरे इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील कुमार सार्थक सुशील महामुणकर इयत्ता सहावी यानी सर्व खेळाडूंवर मात करीत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पदक मिळवून अचूक वेध साधला. त्यामुळे सार्थकची राज्य पातळीवर निवड करण्यात आली आहे. हि राज्य पातळीवरील स्पर्धा पूणे येथे ९ आणि १० फेब्रुवारी रोजी होणार आहे.
सार्थक महामुणकर याची राज्य पातळीवर निवड झाल्याबद्दल माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे, सेक्रेटरी कृष्णा भाई गांधी, चेअरमन नरेंद्र गायकवाड, अरुण पवार, नितीन बामगुडे डॉ. आबासाहेब पाटणकर, ॲड. विनोद घायाळ, मुख्याध्यापिका मनिषा मोरे, सर्व संचालिका, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि प्रशिक्षक यांनी अभिनंदन केले.