दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरी हरेश्र्वर समुद्र किनाऱ्याशेजारील पर्यटन स्थळाची दुरावस्था
साफसफाई नसल्याने कचरा, बियरच्या बाटल्या तसेच शौचालयांदेखील दुरावस्था; पर्यटकांमध्ये नाराजी

प्रतिनिधी – अरुण पवार ( माणगाव ) रायगड जिल्ह्यातील दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरी हरेश्र्वर या तिर्थक्षेत्र समुद्र किनाऱ्याशेजारील आणि पर्यटन स्थळाची दुरावस्था झाल्याचे चित्र गेली अनेक वर्ष पहायला मिळत आहे. या पर्यटन क्षेत्रामध्ये बांधलेल्या पर्यटन विकास अंतर्गत सुलभ शौचालयाची अत्यंत दुरावस्था झाली असून ते बंद अवस्थेत आहे. येथे दररोज हजारो भाविक आणि पर्यटक येत असतात. मात्र समुद्र किनाऱ्याजवळील सुलभ शौचालयाची दुरवस्था पाहून पर्यटक नाके मुरडत आहेत प्रशासनाने या दुरावस्थेकडे जाणूनबुजून कानाडोळा केला आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्र्वर येथील या भागात सर्वत्र कचरा साठून दुर्गंधी पसरली आहे. शौचालयांची दारे गेली अनेक वर्षे दुरुस्तीच्या नावाखाली बंद आहेत तर इतर शौचालयांची दयनीय अवस्था पहायला मिळत आहे. दरवाजे गायब झाले आहेत तर शौचालयांमध्ये दुर्गंधी पसरली आहे.
कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या, बियरच्या बाटल्या सर्वत्र पडलेल्या आहेत. झाडे झुडपे वाढलेली आहेत. पर्यटकांना कोणतीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. मंदिर परिसरातील शौचालय व्यवस्थापनाकडून मात्र शुल्क आकारले जात आहे. परंतु शासनाने बांधलेल्या शौचालयाची बिकट अवस्था झाली आहे.
खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून पर्यटन विकास महामंडळाच्या अंतर्गत हरेश्र्वर, श्रीवर्धन आणि दिवे आगर या पर्यटन क्षेत्रातील समुद्र किनारे सुशोभीकरण करण्यात आले. मात्र हरिहरेश्र्वर येथील समुद्रकिनाऱ्या शेजारील दुरावस्था आणि दुर्दशा झालेली पाहून भक्त आणि पर्यटक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. येथील शौचालयात पाण्याची सोय नाही. पिण्याचे पाणी देखील नाही. त्यामुळे यात्रेकरू व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त करीत आहेत.
हरिहरेश्वर येथील भक्त आणि पर्यटकांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा तातडीने कराव्यात, सुलभ शौचालय दुरुस्त करावे, पिण्याच्या पाण्याची सोय करावी, स्वच्छता राखावी, बसण्यासाठी आसन व्यवस्था करावी अशी मागणी पर्यटक करीत आहेत. तसेच खासदार सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष वेधून सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.