मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय माणगांव येथे खा. सुनिल तटकरे यांची आढावा बैठक संपन्न
प्रतिनिधी - अरुण पवार ( माणगांव )

मुंबई – गोवा महामार्गाचे काम वर्षात मार्गी लावणार – खा. सुनील तटकरे
माणगाव आणि इंदापूर बायपास फेब्रुवारीत सुरू होणार ; माणगावची वाहतूक कोंडीतून होणार सुटका
माणगांव – गेली १७ वर्षे रखडलेल्या अवस्थेत असलेला, अपघातात हजारो जणांचे बळी घेणारा, मृत्यूचा सापळा बनलेला, वाहतुकीच्या कोंडीत अडकलेला, अनेकांचा कर्दनकाळ ठरलेला, असंख्य प्रवाशांची कुटुंब उध्वस्त करणारा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित मुंबई गोवा महामार्गाचे काम माझी सर्व राजकीय ताकद वापरून येत्या नवीन वर्षातच पुर्ण करणार तसेच माणगाव आणि इंदापूर येथील बायपासचे काम एक फेब्रुवारी पासून सुरू करण्यात येईल. दिवा ते वीर मेमू रेल्वे सेवा आणि माणगाव रेल्वे स्थानकामध्ये लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना थांबे मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असून माणगाव आणि इंदापूर येथील प्रवाशांची वाहतूकीच्या कोंडीतून लवकरच सुटका केली जाईल असे अभिवचन रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे यांनी माणगाव येथील आढावा बैठकीत दिल्याने उपस्थित समस्त माणगावकरांनी समाधान व्यक्त केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने कोकणातील सागरी मार्ग आणि ग्रीन फिल्ड एक्सप्रेस महामार्ग सुरू करण्याचे ध्येय ठेवले असून लवकरच या दोन्ही महामार्गाचे सुरू होईल. कोकणातील पर्यटन, रोजगार, उद्योग, शेती, बागायती, फळफळावळ यांना चालना देण्यासाठी हे मार्ग भविष्यात कोकणात नवीन क्रांती घडवून आणणारे आहेत. भविष्यात मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीचा ताण येवू नये आणि वाहतूक सुरळीत राहण्यासाठी हे दोन महामार्ग अत्यंत आवश्यक आहेत. हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे हा महामार्ग तातडीने पूर्ण केला जाईल असे आश्वासन खासदार सुनील तटकरे यांनी दिले.
माणगाव आणि इंदापूर येथील वाहतूकीची कोंडी सोडविण्यासाठी खरवली जोड रस्ता ते मोर्बा अशी वाहतूक मुंबई कडून श्रीवर्धन कडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांसाठी करण्यात येईल. तसेच मोर्बा रोड कालवा मार्ग ते मुंबई गोवा महामार्ग अशी वाहतूक माणगाव शहरात न वळवता सुरू करण्यात येईल. तसेच पुणे येथून कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी लवकरच भादाव येथील काळ नदीवरील पूल बांधण्यात येईल. तसेच माणगाव शहरातील वाहतुकीची कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी काळ नदी आणि गोद नदीवरील पूलांची कामे दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येतील. जे ठेकेदार हे काम वेळेत पूर्ण करणार नाहीत त्यांना शासनाच्या काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करा असे स्पष्ट आदेश खासदार सुनील तटकरे यांनी उपस्थित रायगड जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना दिले.