लाडकी बहिण योजनेबद्दल बहिणींच्या भावनिक प्रतिक्रिया
प्रतिनिधी - अरुण पवार ( माणगांव )

माणगाव – महायुती सरकारने महिला सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जून महिन्यापासून सुरू केली आहे. या योजनेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी या योजनेचे स्वागत केले आहे तर काही जणांनी विरोध दर्शविला आहे. विरोधकांनी या योजनेबद्दल गैरसमज पसरवले आहेत. मात्र बहुतांशी बहिणींनी या योजनेचे मनापासून स्वागत करुन शासनाचे ऋण व्यक्त केले आहेत.
माणगाव येथे बुधवार दिनांक ९ रोजी झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या वचन पूर्ती सोहळ्यात काही सामान्य, गरीब व ग्रामीण घटकातील लाभ मिळालेल्या लाडक्या बहिणींनी भावनिक बोलक्या प्रतिक्रिया देऊन ही योजना अखंडपणे सुरू राहाणे ही काळाची गरज आहे असे निक्षून सांगितले.
गरीब गरजू महिलांकडून मिळालेलल्या प्रतिक्रिया – ही योजना अतिशय चांगली असून आम्हाला या भावांनी मोठा आधार दिला आहे.
दिड हजार आम्हाला लाखमोलाचे आहेत. महिनाभर ही रक्कम पुरवून पुरवून वापरतो. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. आज आम्ही स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करत आहोत. सरकारने आम्हाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला आहे.
भावांना आमची किंमत कळली होती. या सरकारलाच यापुढे मतदान करणार आहोत. कारण त्यांनी आमची जगण्याची चिंता संपवली आहे. या सरकारने आणलेल्या इतर योजनांचा लाभ घेत आहोत. त्यामुळे घर आणि संसाराचा गाडा चालवणे सोपं जात आहे.
आदिवासी महिलांकडून मिळालेल्या प्रतिक्रिया – या दिड हजारांत मुलांना शाळेत जाण्यासाठी चप्पल, दप्तर, वह्या, पुस्तके, गणवेश आणि खायला थोडेफार पैसे देता येतात. आता आमच्या झोपडीत दररोजच्या दररोज चूल पेटवत आहोत असे एका आदिवासी महिलेने डोळ्यात आनंदाश्रू आणून सांगितले.
शासनाच्या विविध योजनांचा फायदा झाला आहे. त्यामुळे आता आम्ही वीटभट्टीवर काम करण्यासाठी जात नाही. मजुरीचे काम करीत नाही. मासेमारी करीत नाही अशी देखील प्रतिक्रिया आदिवासी महिलेंकडून मिळाली.
मी विधवा आहे. माझा माघारी अपघातात गेला. पण तरीही हे सरकार कामी आले. घर बांधून दिले, अंत्योदय योजना सुरू केली, रेशनकार्डवर धान्य मिळत आहे. शिलाई मशीन मिळाली. आता या दिड हजारांमुळे मुलांना चांगले शिक्षण मिळत असल्यामुळे जीवन जगणे सोपे झाले आहे.