जे लोक स्वप्न घेऊन पुढे चालतात, त्यांचे स्वप्न साकार होतात – सोमनाथ घार्गे (रायगड पोलिस अधिक्षक)
सुहित जीवन ट्रस्ट, पेण येथे "बाल संरक्षण, सतर्कता व सुरक्षितता" जनजागृती अभियान संपन्न

प्रतिनिधी – किरण बांधणकर ( पेण ) – “जे लोक स्वप्न घेऊन पुढे चालतात, त्यांचे स्वप्न साकार होतात. जे स्वप्न बघत आहेत परंतु त्या स्वप्नांच्या दिशेने जात नाहीत ते तिथेच राहणार” सुहित जीवन ट्रस्टच्या डॉ. सुरेखा मॅडम यांनी तुमच्या सारख्या विशेष मुलांना आधारवड निर्माण करून दिला आहे. राख्या, पायपुसण्या व कागदी पिशव्या, फुलांचे गुच्छ, दिवाळीच्या सणानिमित्त पणत्या, कंदिल, व इतर साहित्य बनवून त्याचे स्टॉल लावून त्या विक्रीतून या मुलांना रोजगार उपलब्ध करून शिक्षण, प्रशिक्षण या बरोबरच व्यावसायिक ज्ञान देऊन स्वावलंबनाचे धडे दिले आहेत ही कौतुकाची बाब आहे.” असे कौतुकोत्गार रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी बालसंरक्षण, सतर्कता आणि सुरक्षितता या जनजागृतीपर कार्यशाळेत मनोगत व्यक्त करताना काढले.
महिला व मुलांच्या सुरक्षितता या विषयान्वये “बाल संरक्षण आणि सुरक्षितता” या विषय संदर्भात पेण येथील सुहित जीवन ट्रस्टच्या सुमंगल गतिमंद मुलांच्या शाळेत सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविक करताना डॉक्टर सुरेखा पाटील यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा मांडताना सुरुवातीच्या काळातील कठीण अनुभव सांगताना त्यांचा कंठ दाटून आला होता. जिद्द, मेहनत व आत्मविश्वास याबरोबरच संस्थेच्या कार्यक्रमातून जोडत गेलेल्या मान्यवरांच्या सहकार्यामुळे ही वाटचाल सुकर झाली असल्याचे त्यांनी सांगितले. सद्यस्थितीमध्ये समाजात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात विशेष मुलांच्या अव्यक्त भावनांना या अभियानाद्वारे समाजापर्यंत पोहोचण्याच्या प्रामाणिक प्रयत्नास योग्य दिशा मिळेल. असा विश्वास बाल न्याय मंडळ सदस्या डॉ. नीता कदम यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेमधील शिक्षिका अपर्णा जाधव यांनी केले असुन संस्थेच्या या अभिनव उपक्रमाचे समाजातील सर्व स्तरांवर कौतुक केले जात आहे.
यावेळी रायगड पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल, डॉ. नीता कदम (बाल न्याय मंडळ सदस्या), पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ऍड. मंगेश नेने, सिद्धि प्रिंटर्स, मुंबई चे मालक भूषण पाठक, संस्थेच्या संस्थापिका व अध्यक्षा डॉ. सुरेखा पाटील, सचिव वरूण पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते.