
प्रतिनिधी – अरुण पवार ( माणगाव ) माणगाव येथील ५२ व्या माणगाव तालुका विज्ञान प्रदर्शनामध्ये अशोक दादा साबळे विद्यालयातील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या सृष्टी रामचंद्र भिलारे या विद्यार्थीनीने इयत्ता सहावी ते आठवी या दिव्यांग गटातील प्रतिकृती, निबंध, वक्तृत्व आणि प्रश्नमंजुषा या सर्व प्रकारात प्रथम क्रमांक पटकावून तालुका स्तरावर विक्रम स्थापन करीत शाळेचे नाव उज्वल केले आहे.
माणगाव येथील माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अशोक दादा साबळे विद्यालय आणि विज्ञान – गणित अध्यापक मंडळाने ३ आणि ४ जानेवारी रोजी ५२ वे तालुका विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते. या विज्ञान प्रदर्शनामध्ये प्राथमिक गटात ४९ तर माध्यमिक गटात ३३ विज्ञान प्रतिकृती मांडण्यात आल्या होत्या. या वैज्ञानिक प्रतिकृती पाहण्यासाठी दररोज हजारो विद्यार्थी आले होते.
बक्षीस वितरण समारंभात मुख्य आकर्षण सृष्टी रामचंद्र भिलारे हि अशोक दादा साबळे विद्यालयातील विद्यार्थीनी ठरली. तीने प्रतिकृती, निबंध, वक्तृत्व आणि प्रश्नमंजुषा या चारही स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून उज्वल यश मिळवले. त्यामुळे तीची निवड जिल्हा स्तरावर करण्यात आली आहे. सृष्टीने आपल्या प्रखर बुद्धीमत्तेच्या जोरावर आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वामुळे गत वर्षी तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर विज्ञान प्रदर्शनात अव्वल क्रमांकांची बक्षिसे पटकावली होती. कुमारी सृष्टी भिलारे हिला शाळेतील शिक्षिका किर्ती रामदास पुराणिक आणि सर्व गणित व विज्ञान शिक्षकांनी मार्गदर्शन केले आहे.
सृष्टीच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे, सेक्रेटरी कृष्णा भाई गांधी, चेअरमन नरेंद्र गायकवाड, नितीन बामगुडे, डॉ. आबासाहेब पाटणकर, ॲड. विनोद घायाळ, मुख्याध्यापक धनाजी जाधव, उपमुख्याध्यापक दिलीप उभारे आणि शिक्षकांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.