जे. बी. सावंत हायस्कूल लोणेरे शाळेतील 1996 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा.
३० वर्षांनी मित्र मैत्रीणींनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

प्रतिनिधी – राम भोस्तेकर ( लोणेरे ) शालेय जीवनानंतर प्रत्येक जण आपआपल्या आयुष्यात आपले कुंटुब आणि परिवारात रमुन जात असतो पण लहानपणी शालेय जीवनात मित्र – मैत्रीणींसोबत घालवले ते क्षण कुठेतरी हरवल्या सारखे प्रत्येकाला जाणवत असतात. कुठेतरी व्यक्त व्हावं, पुन्हा त्या आठवणींना उजाळा मिळावा, तेच धावपळीचे आयुष्य जगत कुठेतरी विश्रांती घ्यावी, मित्रांमध्ये वेळ घालवावा असे अनेकांना वाटत असते. यामध्ये तुम्हाला निडफुल काय आहे? याचा विचार कमीच होतो. धावताधावता थकून जाताना मग कोठेतरी विरंगुळा शोधला जातो. चार मित्रांच्या संगतीने कोठेतरी फेरफटका होतो किंवा मग गेट टुगेदरची कल्पना कोणीतरी सुचवतो अशीच कल्पना जे. बी. सावंत हायस्कूल पन्हळघर – लोणेरे शाळेच्या इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत सोबत असलेल्या १९९६ च्या दहावी बॅचच्या काही विद्यार्थ्याच्या मनात रुजली आणि या कल्पनेतून ९ फेब्रुवारी २०२५ रोजी स्नेह मेळाव्याचे आयोजन वर्ग मॉनिटर अरुण शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली माणगाव येथे करण्यात आले होते. या स्नेह मेळाव्याचा आनंद ६७ मित्र मैत्रीणींनी घेतला.
शालेय मित्रमैत्रिणींच्या गेट टुगेदरमुळे मैत्रीची नाळ जपण्याचा एक सुरेख संगम हल्ली अनेक ठिकाणी साधला जात आहे. जत्रा, यात्रा, सण, उत्सवाद्वारे क्यचितच गावातील मित्र एकत्रित येत असतात यातून समाजाचे एकत्रिकरण होतेच पण याहीपेक्षा कोणताही सण, उत्सव नसताना केवळ एकमेकांना भेटण्यासाठी हल्ली ‘गेट टुगेदर’ चे आयोजन केले जातात असेच गेट टुगेदर जे. बी. सावंत हायस्कूल पन्हळघर – लोणेरे शाळेच्या इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत सोबत असलेल्या १९९६ च्या दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांनी केले या स्नेह मेळाव्याच्या सुरुवातीला उल्लेखनीय कामगिरी तसेच उच्च शिक्षण घेऊन उच्च पदावर कार्यरत असलेल्या तसेच लोकप्रतिनिधी असलेल्या मित्र मैत्रीणींचे शाल पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
लहानपणापासून एकत्रित शिकता शिकता कोणी शिक्षणांसाठी तर कोणी उद्योगासाठी तर कोणी लवकरच लग्नाच्या गाठीत बांधत वेगवेगळ्या दिशेला गेलेल्या मित्र – मैत्रीणींनी आपआपली ओळख करून देत जुन्या आठवणी सांगितल्या तसेच शाळा शिकतं असताना अनेक किस्से घडलेले सांगत शिक्षकांनी मारलेले फटके, एकमेंकाच्या काढलेल्या खोड्या, शाळेत खेळलेले खेळ असा लेखाजोखा ३० वर्षानंतर मांडण्यात आला. अनेक गप्पा गोष्टी करता करता उजाळा देता देता अनेकांना गहीवरुन आलं, एकमेकांना मिठी मारून आनंद व्यक्त केला गेला. अनेकांच्या चेहेऱ्यावर वेगळेच हावभाव दिसून आले सोबतच कोणी शिक्षक इंजिनिअर. वायरमन, सरपंच, अनेक हुद्यावर काम करणारे सवंगडी मिळाल्याने एकमेकांचे कौतुक देखील करण्यात आले. रवि मोरे, राजेंद्र मोरे, संतोष करकरे, रंजना शिर्के, केशव जांबरे यांनी आपल्या सुंदर आवाजात गाणी म्हणत सर्वांना मंत्रमुग्ध केले. एकत्रितपणे स्नेह भोजन देखील करण्यात आला.
लहानपणीच आयुष्य जगत असताना शाळेचे जीवन कधी संपला हे कधीच कोणाला कळाले नाही. आता फक्त राहिल्या चार भिंती आणि घरामध्ये असलेले साहित्य. याकडे बघण्यापलीकडे आपल्या आयुष्यात काही राहिलेच नाही. आणि आता आपण जगायचे ते फक्त पुढच्या पिढीसाठी. त्यामुळे मनात नेहमीच असं वाटतं की बालपण देगा देवा. मी लहान होतो तोच बरा होतो. हे शब्द फक्त शालेय जीवनातून शिल्लक राहिले अशी बोलकी प्रतिक्रीया उपस्थित सर्वांची होती. अखेर एकमेकांचे संपर्क क्रमांक शेअर करत नेहमीच संपर्कात रहात जा, पुन्हा अशाच प्रकारे गेट टुगेदरचे आयोजन करु या, मज्जा आली.. लहानपणीच्या आठवणीं ताज्या झाल्या असे म्हणत डोळ्यात आठवणीचे आश्रु घेत, फिर मिलेंगे म्हणत स्नेह मेळाव्याची सांगता करण्यात आली.