म्हसळा येथील पाभरे – चिचोंडे ओढ्यात सापडली महाकाय मगर…
वनक्षेत्रपालांचे जनतेला सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

प्रतिनिधी – संतोष उध्दरकर ( म्हसळा ) तालुक्यातील पाभरे गावाच्या हद्दीतील चिंचोढे रस्त्यालगतच्या नदी पात्राचे ओढ्यात १३.४ फूट लांबीची २३० किलो वजनाची मगरीचे दर्शन स्थानिकांना झाले. या मगरीला पाहिल्यानंतर स्थानिक नागरिकांनी म्हसळा वन विभागाचे वनक्षेत्रपाल संजय पांढरकामे यांना मगर असल्याची माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी सहयाद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था यांना याबाबत माहिती दिली. चिंचोंडे येथील ओढयात मगर असल्याची माहिती पाभरे परिसरात हा हा म्हणता वाऱ्यासारखी पसरल्याने बघ्यांची गर्दी वाढली होती. तासाभरात रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहचून या मगरीला रेस्क्यू करण्याचे काम सुरु झाले. मगरीचा आकार मोठा असल्याने मोठ्या शिताफीने या मगरीला रेस्क्यु करण्यात यश आले असुन वनविभाग म्हसळा, वनकर्मचारी पाभरे आणि रेस्क्यू टीमने मगरीला तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडले.
तालुक्यातील पाभरे चिंचोडे येथील ओढ्यात महाकाय मगर सापडल्याने आणखी मगरी किंवा मगरीची पिल्ले असण्याची शक्यता नाकारत येत नाही त्यामुळे पुढच्या आठवड्यात शाळांना दिपावलीची सुट्टी पडते. शालेय विद्यार्थी – मुले सुट्टीचा आनंद घेण्यासाठी नदी, नाले, ओढ्याच्या पाण्यात पोहण्यासाठी जातात त्यामुळे विद्यार्थी आणि नागरिक यांनी काळजी घेऊन सतर्क राहण्याचे आवाहन म्हसळा वनक्षेत्रापाल संजय पांढरकामे यांनी केले आहे.
मगर पकडण्याची मोहीम यशस्वी करण्यासाठी सहयाद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था तसेच वनक्षेत्रपाल संजय पांढरकामे, वनपाल प्रवीण शिंदे, वनपाल वैभव शिंदे, वनरक्षक शशिकांत चेवले, वनरक्षक गजानन छोटे, वनरक्षक रुपेश देवरे, वनरक्षक सतीश खरात, वनरक्षक सागर घुबे,वनरक्षक चरण चव्हाण आदींनी मेहनत घेतली.