19 वर्षाखालील मुलींच्या रायगड जिल्हा क्रिकेट संघात माणगांवच्या कु. वेदिका तेटगुरे व कु. कनक यादव यांची निवड…
दोन्ही खेळाडू माणगांवातील एन.एस. क्रिकेट अकॅडमीत घेतात प्रशिक्षण

प्रतिनिधी – सचिन पवार ( माणगांव ) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेकरिता रायगड जिल्ह्यातील मुलींची नुकतीच निवड चाचणी घेण्यात आली होती. या निवड चाचणीसाठी संपूर्ण रायगड जिल्ह्यातून खेळाडु मुली उपस्थित होत्या. या निवड चाचणीमध्ये माणगांव एन. एस. अकॅडमीच्या कुमारी वेदिका तेटगुरे व कुमारी कनक यादव यांची रायगड जिल्हा संघात निवड करण्यात आली असल्याची माहिती त्यांचे प्रशिक्षक श्री. नयन शिंदे यांनी दिली. प्रशिक्षक नयन शिंदे यांनी मुलींसाठी घेतलेल्या विशेष प्रयत्नांना यश आल्यामुळे शिंदे यांनी कु. वेदिका तेटगुरे व कु. कनक यादव यांच्या खेळातील प्रगती बाबत समाधान व्यक्त केले व त्यांचे अभिनंदन केले.
माणगांव तालुक्यातील कु. वेदीका तेटगुरे व कु. कनक यादव या दोन्ही मुलींची निवड रायगड जिल्ह्याच्या संघात झाली असुन लवकरच हा संघ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या निमंत्रित स्पर्धेत खेळणार आहे, कु. वेदीका तेटगुरे ही एक ऑल रांऊडर असुन कु. कनक ही उत्कृष्ट बॉलर आहे, या दोघींनीही त्यांच्या उत्कृष्ट खेळीने निवड चाचणी पास करीत संघात जागा मिळवली आहे. त्यामुळे दोघीही आपल्या खेळीच्या जोरावर राज्यस्तरीय खेळात माणगांवचेच नाही तर रायगड जिल्ह्याचे नाव लौकीक करतील. कु. वेदीका तेटगुरे व कु. कनक यादव या दोन्ही मुलींची निवड रायगड जिल्ह्याच्या संघात झाल्याने माणगांव वासियांसाठी अभिमानाची बाब ठरली त्यामुळे संपूर्ण माणगांव तालुक्यातून या दोघींचे अभिनंदन करण्यात येत असुन पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देखील व्यक्त केल्या जात आहेत .