आदिती तटकरे विक्रमी 82,193 मतांनी विजयी
लाडक्या बहिणींनी केले भरघोस मतदान ; महायुतीच्या कार्यकर्त्यांनी माणगांवात केला जल्लोष

प्रतिनिधी – अरुण पवार (माणगांव) श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुमारी आदिती तटकरे यांनी प्रथमच सर्वाधिक ८२ हजार १९३ मते मिळवून ऐतिहासिक विक्रम करुन विजय संपादन केला आहे. पहिल्या फेरीपासून ते शेवटपर्यंत आदिती तटकरे या आघाडीवर राहील्या होत्या. या मतदारसंघात १ लाख ६२ हजार ७९४ मतदानापैकी आदिती तटकरे यांना तब्बल १ लाख १५ हजार २२६ तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार अनिल नवगणे यांना केवळ ३३ हजार ०३३ मते मिळाली. आदिती तटकरे या ८२,१९३ इतकी सर्वाधिक मते मिळवून विजयी होणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील पहिल्या महिला तरुण विजयी उमेदवार ठरल्या आहेत. हा विक्रमी विजय सर्व मतदार, कार्यकर्ते आणि लाडक्या बहिणींना अर्पण करीत आहे अशा भावना आदिती तटकरे यांनी विजयानंतर व्यक्त केल्या. विजयानंतर श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, तळा आणि रोहा येथे जल्लोषात विजयी मिरवणूका काढण्यात आल्या. त्यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आदिती तटकरे यांचे अभिनंदन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना रायगड जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत प्रभावी ठरलेली स्पष्टपणे दिसून आले आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रात महायुतीची सत्ता स्थापन होणार आहे. हि योजना घराघरात पोहोचली असल्याने महायुतीच्या उमेदवारांना निश्चितच फायदा झाला आहे असे दिसत आहे. ही योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी आदिती तटकरे यांनी सुक्ष्म नियोजन करून तळागाळातील लाडक्या बहिणींपर्यंत पोहचवली. त्याचा फायदा त्यांना झाला आहे. लाडक्या बहिणींनी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात आदिती तटकरे यांना भरघोस मतदान करुन विजयाचा मार्ग सुकर केला.
विशेषतः या मतदारसंघातील सर्व जाती धर्माच्या मतदारांनी आदिती तटकरे यांना स्विकारुन जातीय द्वेष पसरविण्याचे काम करणाऱ्यांना चांगलीच चपराक दिली आहे. ६० टक्के बहूसंख्य असलेल्या कुणबी समाजाने आदिती तटकरे यांच्या विरोधात कुणबी समाजाचे उमेदवार अनिल नवगणे असूनही त्यांना मतदान न करता विकासाच्या बाजूने मतदान करुन जातीपातीच्या राजकारणाला आदिती तटकरे यांच्या विजयाने मुठमाती दिल्याचेही संकेत दिले आहेत. त्याच बरोबर मुस्लिम, आदिवासी, मागासवर्गीय, आगरी, भंडारी, शिंपी आदी सर्व समाजातील घटकांनी मोठ्या प्रमाणात आदिती तटकरे यांना मतदान केले. त्यामुळे विजय अधिक सोपा झाल्याचे दिसून येते.
मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांचा सतत मतदारांशी संपर्क, या विधानसभा मतदारसंघात केलेली हजारो कोटींची विकासकामे, निसर्ग चक्रीवादळ आणि कोरोना काळात केलेले महत्वपूर्ण कार्य, निवडणूकीत केलेले सुक्ष्म नियोजन, कार्यकर्त्यांनी केलेली अपार मेहनत, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, शासन आपल्या दारी यांसारख्या अनेक सरकारी योजनांचा मिळवून दिलेला लाभ यांचा प्रामुख्याने आदिती तटकरे यांना झाल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.
महविकास आघाडीतर्फे सुरवातीला घोळ झाला होता. तो पेच शेवटपर्यंत कायम राहिला. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ हा पारंपरिक शिवसेनेचा होता. मात्र हि जागा आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेली. त्यामुळे शिवसैनिक नाराज झाले. अनिल नवगणे हे शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख होते. त्यांना नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी देण्यात आली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कोणीही समर्थक आणि कार्यकर्ते नव्हते. नवगणे यांना आयत्यावेळी उमेदवारी मिळाल्याने त्यांना सर्व मतदारांपर्यंत पोहचता आले नाही. राजा ठाकूर आणि कृष्णा कोबनाक यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. त्याचा फायदा आदिती तटकरे यांना झाला. मात्र आदिती तटकरे यांनी या मतदारसंघात सर्व पाच तालुक्यात गाव बैठका घेऊन प्रचाराचा धडाका लावला होता. सर्वांना बरोबर आणि विश्वासात घेऊन अगदी काटेकोरपणे प्रचाराचे नियोजन केले होते. तसेच शिवसेना, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेली मदत महत्वपूर्ण निर्णायक ठरली. त्यामुळे आदीती तटकरे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.
८