आदिती तटकरे, भरत गोगावले मंत्रीपदाचे दावेदार तर प्रशांत ठाकूर, महेंद्र दळवी शर्यतीत
मंत्रीपद कोणाला मिळणार ? रायगड करांची उत्सुकता शिगेला

प्रतिनिधी – अरुण पवार ( माणगाव ) रायगड जिल्ह्यात महायुतीचे सातही उमेदवार विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यामुळे श्रीवर्धनच्या आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे आणि महाडचे आमदार भरत गोगावले हे मंत्रीपदाचे दावेदार मानले जात आहेत. तर पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि अलिबागचे आमदार महेंद्र दळवी हे मंत्री पदाच्या शर्यतीत आहेत अशी जोरदारपणे चर्चा सुरू झाली आहे. हे चारही आमदार भरघोस मतांनी निवडून आले आहेत. त्यामुळे राज्यातील मंत्री मंडळात कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण रायगड जिल्ह्यातील मतदारांची उत्सुकता लागून राहिली आहे.
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून तब्बल ८२,००० मताधिक्याने निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकमेव आमदार महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचें मंत्री पद जवळ जवळ निश्चित झाले आहे. महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आणण्यासाठी सुपरहिट ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अतिशय प्रभावी ठरलेली आहे. हि योजना घराघरात पोहोचविण्यासाठी या विभागाच्या चाणाक्ष मंत्री आदिती तटकरे यांनी काटेकोरपणे नियोजन केले होते. त्याचा लाभ २ कोटी ५४ लाख महिलांना झाला आहे. त्यामुळे आदीती तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर संपूर्ण महायुतीचे नेते आणि सरकार खुष झाले आहे. महायुतीचे सरकार आणण्यात लाडक्या बहिणींचे विशेष योगदान राहिले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदीती तटकरे यांचे मंत्रिपद निश्चित मानले जात आहे. केवळ शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. या अगोदर आदिती तटकरे या महिला आणि बालविकास विभागाच्या कॅबनेटमध्ये एकमेव मंत्री होत्या. त्यामुळे त्यांनाच त्याच विभागाच्या मंत्री पदाची जबाबदारी देण्यात येणार आहे अशी खात्री लायक माहिती मिळाली आहे. त्यामुळे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील मतदार आणि कार्यकर्ते पून्हा एकदा जल्लोष करण्याच्या तयारीत आहेत असे समजते.
याच बरोबरीने श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाला लागूनच असलेल्या महाड – पोलादपूर – माणगाव विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा दणदणीत मतांनी निवडून आलेले आणि विजयाचा चौकार मारणारे शिवसेना पक्षप्रतोद, एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि विद्यमान दानशूर आमदार भरत गोगावले हे प्रमुख दावेदार आहेत. गेल्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दाखातर मंत्री पदावर पाणी सोडून त्याग केला होता. यावेळी मात्र भरत गोगावले यांना थेट कॅबिनेटमध्ये मंत्री पद निश्चितच मिळेल असा कार्यकर्त्यांना मनापासून आत्मविश्वास वाटत आहे. तसेच भरत गोगावले हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी मानले जातात. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या बंडातील आमदारांना एकत्र करण्यासाठी आणि विश्वास देण्यासाठी महत्वपूर्ण निर्णायक जबाबदारी आमदार भरत गोगावले यांच्याकडे देण्यात आली होती. त्यामुळे भरत गोगावले यांचेही नाव मंत्री मंडळात असणार आहे हे निश्चित झाले आहे असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे चौथ्यांदा आमदार झालेले पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि अलिबागचे आमदार महेंद्र दळवी हे मंत्री पदाच्या शर्यतीत आहेत असे खास वृत्त आहे. या दोन्ही आमदारांनी आपल्या मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवारांना पराभूत करीत शेकापला पून्हा डोके वर काढू दिले नाही. सुरवातीला पनवेल विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर, त्यानंतर पेण विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार रविंद्र पाटील, अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी रायगड जिल्ह्यातून शेकापला रायगड जिल्ह्यातून जवळपास हद्दपार केले असल्याचे दिसून येत आहे.
यापैकी भाजपचे प्रशांत ठाकूर यांना मंत्रिपद देऊन पनवेल विधानसभा मतदारसंघाचा सन्मान करावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केलेली आहे. रायगड जिल्ह्यात भाजपचे तीन तर शिवसेनेचेही तीन आमदार आहेत. आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे अध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी हाडवैर असल्याने आणि निवडणूकीत पंगा घेतल्याने ते मंत्री पदाच्या शर्यतीत नाहीत बाद झाल्याचे समजते. आमदार प्रशांत ठाकूर यांना राज्यमंत्री पद देताना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात येणार आहे. गतवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्री आदिती तटकरे या पालकमंत्री असताना आमदार भरत गोगावले, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांनी आदिती तटकरे यांच्या विरोधात उठाव केला होता. त्यामुळे त्यांना पालकमंत्री पद देण्यात येणार नाही असे समजते. तसेच भारतीय जनता पक्षाला रायगड जिल्ह्यात संघटन आणि विस्तार करायचा असल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासारख्या मुरब्बी तरुण चेहर्याला संधी देण्यासाठी सर्व नेत्यांनी अनुकुलता दर्शविली आहे. त्यामुळे प्रशांत ठाकूर यांच्या कडे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात येवू शकते. असे झाल्यास नवल वाटायला नको.
अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी हे ही मंत्री पदासाठी इच्छुक आहेत. अलिबाग मधील शेतकरी कामगार पक्षाची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी आमदार महेंद्र दळवी यांचा सिंहाचा वाटा आहे. ते दुसऱ्यांदा शेकापच्या चित्रलेखा पाटील यांचा दणदणीत पराभव करीत विजयी झाले आहेत. सर्वांना बरोबर आणि विश्वासात घेऊन विकास कामे करणारे आमदार म्हणून महेंद्र दळवी हे सुप्रसिद्ध आहेत. तेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे विश्वासू सहकारी असल्याने आणि शिवसेनेचे संघटना मजबूत करण्यासाठी त्यांना मंत्री पद देण्यात यावे अशी अलिबाग आणि मुरुड येथील शिवसैनिकांची मागणी आहे. या मागणीला वरीष्ठांकडून चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा शिवसैनिकांना आहे.
राज्यात भारतीय जनता पक्षाचे १३६, शिवसेनेचे ५८ तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ४१ आमदार निवडून आले आहेत. रायगड जिल्ह्यात महायुतीचे ७ आमदार निवडून आले आहेत. त्यापैकी भाजपचे ३, शिवसेनेचे ३ आणि राष्ट्रवादीचा १ आमदार आहेत. आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांचे मंत्रिपद निश्चित मानले जात आहे. तसेच भारतीय जनता पक्षाकडून प्रशांत ठाकूर यांनाही मंत्री पद दिले जावू शकते. त्याचबरोबरीने महेंद्र दळवी यांना यांना तडजोडीत राज्यमंत्री किंवा कॅबनेट दर्जाचे महामंडळाचे अध्यक्षपद दिले जावू शकते. मंत्रालयाच्या माहितीनुसार भाजप २४, शिवसेना १२, राष्ट्रवादी १० अशी मंत्री पदाची विभागणी करण्यात येणार आहे. त्यामुळे कुणाची वर्णी राज्याच्या मंत्री मंडळात लागेल आत्ताच सांगता येणार नाही. मात्र दोन मंत्री रायगड जिल्ह्याला मिळण्याची दाट शक्यता आहे असे सांगण्यात येत आहे.