“माझं पेण”च्या सदस्यांनी रेल्वे प्रश्ना बाबत घेतली खा. सुनील तटकरे यांची भेट
प्रतिनिधी - किरण बांधणकर ( पेण)

“माझं पेण” संघटनेच्या सदस्यांनी पेण येथील रेल्वेप्रश्नाबाबत खासदार सुनील तटकरे यांची आज दि.०४ ऑगस्ट रोजी सुतारवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली व रेल्वेप्रश्नाबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. खासदार सुनील तटकरे यांनी पेणच्या रेल्वे प्रश्नाबाबत लोकसभेमध्ये आवाज उठवल्याबद्दल त्यांचे माझं पेणच्या वतीने आभार मानण्यात आले. या सदिच्छा भेटी दरम्यान मा. खासदार सुनिलजी तटकरे यांना माझं पेण यांच्या वतीने कोकण रेल्वे बाबत निवेदन देण्यात आले. या निवेदनात
- पनवेल-वसई-पनवेल व पनवेल डहाणू पनवेल मेमू ट्रेन पेण पर्यंत एक्सटेंड करण्यात यावी.
- दिवा सावंतवाडी दिवा कोविड काळापूर्वी प्रमाणे पुन्हा पेण स्थानकात थांबावी.
- एक्सप्रेस गाड्यांना पेण येथे थांबा मिळावा.
- स्थानकातील फूट ओव्हर ब्रिजची चुकलेली जागा स्थानिकांच्या मागणीनुसार स्थानकाच्या मध्यावर फुट ओव्हर ब्रिज बांधण्यात यावा.
या मागण्या मार्गी लावण्यासाठी “माझं पेण” संघटनेतर्फे खासदार सुनील तटकरे यांना निवेदन देण्यात आले. मागण्यांपैकी पनवेल – वसई – पनवेल व पनवेल – डहाणू – पनवेल या ट्रेन पेण पर्यंत एक्सटेंड करणे व दिवा सावंतवाडी दिवा या गाडीला पेण स्थानकात थांबा मिळावा या दोन महत्त्वाच्या मागण्या खात्रीशीर रित्या लवकरात लवकर पूर्ण होतील अशी ग्वाही माननीय खासदार सुनील तटकरे यांनी “माझं पेण” संघटनेच्या सदस्यांना यावेळी दिली.