पन्हेळी ग्रामस्थांची पाणी टंचाईवर मात कृषी विभागाच्या पुढाकाराने श्रमदानातून बांधले वनराई बंधारे
प्रतिनिधी - नंदकुमार चांदोरकर ( चांदोरे )

चांदोरे/माणगाव – पन्हेळी येथे लोकसहभागातून व कृषी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई बंधारे बांधण्यात आले. पन्हेळी गावात दर वर्षी जानेवारी महिन्यापासून तीव्र पाणी टंचाई निर्माण होते त्यामुळे पाण्याअभावी रब्बी पिकांना पाणी मिळत नाही त्यामुळे पिकाच्या उत्पन्नावर परिणाम होतो यावर मात करण्यासाठी ग्रामस्थ प्रत्येक वर्षी वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेत असतात याहीवर्षी ग्रामस्थांनी वनराई बंधारा बांधला आहे.
गावात दरवर्षी ५ ते ६ बंधारे बांधण्यात येतात या बंधाऱ्यासाठी लागणाऱ्या पिशव्यांचा पुरवठा कृषी विभागामार्फत करण्यात आला आहे. बंधाऱ्यामुळे पन्हेळी गावातील सुमारे १० ते १५ एकर क्षेत्रांवरील भाजीपाला व कडधान्य पिके घेण्यात येतात बांधाऱ्यांमुळे रब्बी हंगामातील काकडी, कलिंगड, कारली, मिरची पालेभाजी यांसारखी हंगामी पिके तसेच आंबा, काजू व फणस यांसारख्या बहुवार्षिक फळ पिकांनाही फायदा होणार आहे तसेच जमिनीच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ होत आहे. या बंधाऱ्याच्या कामात कृषी विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी दिनेश चांदोरकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. बंधारे बांधल्यामुळे पाण्याची समस्या सुटणार असल्याने शेतकरी वर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या श्रमदाना वेळी गावचे सरपंच, उपसरपंच गाव अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य तसेच महिला मंडळ तसेच कृषी विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी दिनेश चांदोरकर उपस्थित होते.