सिडको महामंडळाने संपादित केलेल्या जमीनीवर तसेच संपादित करण्यात येत असलेल्या भूखंडावर अनधिकृतपणे डेब्रीज टाकणाऱ्यांविरुध्द सिडको व पोलीस प्रशासनाची कारवाई
प्रतिनिधी - विठ्ठल ममताबादे ( उरण )

उरण – सिडको महामंडळाने संपादित केलेल्या तसेच संपादित करण्यात येत असलेल्या जमीनीवर / भूखंडावर मोठया प्रमाणात अनधिकृतपणे डंपर वाहन चालकाकडून डेब्रीज टाकण्यात येत असून सदरचे डेब्रीज हे मानवी आरोग्यास धोकादायक व पर्यावरणास हानीकारक असल्याचे निदर्शनास आले आहे. अनधिकृत डेब्रीजला आळा घालण्याच्या दृष्टीने मुख्य दक्षता अधिकारी, सिडको यांच्या नेतृत्वाखाली दक्षता तपास अधिकारी, सुरक्षा विभाग, अभियांत्रीकी विभाग व पोलीस विभाग यांचेसह दिनांक १८/१२/२०२४ रोजी दिवसा सिडको कार्यक्षेत्रात मोहिम राबवत असताना दुपारी १४:३० वाजताचे सुमारास डंपर क्र. १) MH-४३-E-०२७८ वरील चालक हुसेन शेख, वय ४० वर्ष, २) MH-०४-FU-७१८६ चालक देवानंद यादव चौधरी, वय ६० वर्षे, 3) MH-०३-CP-९१६४ वरील चालक कमलसिंग यादव, वय २८ वर्षे, व त्यांचे मालक यांनी आपसात संगनमत करुन डेब्रीज अनधिकृतपणे उरण तालुक्यातील जासई येथील दत्तमंदिराच्या बाजुला ये-जा करणाऱ्या तसेच स्थानिक लोकांच्या आरोग्यास व जिवीतास हानी होईल अशा बेकायदेशीर पध्दतीने टाकून सिडकोच्या अधिसुचित क्षेत्रातील जागेचे विद्रुपीकरण करण्यास कारणीभूत झाल्याने डंपर चालक यांना डंपरसहित ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या डंपर चालकांविरुध्द उरण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ०४०४/२०२४ भारतीय न्याय संहिता ( बी.एन.सी. ) २०२३ चे कलम २८०, ३ ( ५ ), महाराष्ट्र मालमत्ता विरुपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ चे कलम ३ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी दिली आहे. या सिडको परिक्षेत्रात अनधिकृत डेब्रीज टाकत असताना कोणी आढळल्यास सिडकोच्या www.cidco.maharashrta.gov.in या वेब साईट वर तसेच संबंधीत पोलीस ठाण्यात कळविण्यात यावे असे आवाहन सिडको प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.