मुंबई गोवा महामार्गावरील प्रवास ठरतोय जीवघेणा ; दररोज अपघातांची मालिका सुरुच
वाहतूक कोंडीने व्यापार ठप्प ; माणगावकरांचा तीव्र संताप

प्रतिनिधी – अरुण पवार ( माणगाव ) मुंबई गोवा महामार्गावरील दररोजच्या लहान मोठ्या अपघातात प्रवाशांचे नाहक बळी जात आहेत. त्यामुळे प्रवाशांना प्रवास जीवघेणा ठरतो आहे. हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. माणगाव शहरातील दररोजच्या वाहतूक कोंडीने व्यापाऱ्यांचा व्यापार ठप्प झाले आहे. या महामार्गाच्या बाजूने चालणे देखील मुश्किल आणि अवघड होऊन बसले आहे. याबाबत माणगाव मधील नागरिक लोकप्रतिनिधींवर राग काढून तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. या ज्वलंत समस्येवर तातडीने मार्ग काढून जनतेला मोकळा श्वास घेण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
यापूर्वी हा महामार्ग दूपदरी होता. १७ वर्षांपासून या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या काळात या महामार्गावर अपघातांत हजारो नाहक बळी जाऊन मृत्युमुखी पडले आहेत. अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. अनेकांची संसार रस्त्यावर आली आहेत. त्यामुळे हा महामार्ग जीवघेणा ठरत आहे. हा महामार्ग मृत्यूचा महामार्ग म्हणून ओळखला जात आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. कोलाड ते लोणेरे या ३० किमी अंतरात संपूर्ण रस्ता अत्यंत खराब झाला आहे. वाहनचालकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी फलक आणि दिशादर्शक लावले नसल्याने सातत्याने अपघात होत आहेत.
पावसाळ्यात असंख्य खड्ड्यात पाणी साचते त्यामुळे खड्डे दिसत नाहीत. उन्हाळ्यात धुळीचे लोट पसरत असल्याने अपघात होत असतात. मोऱ्या बांधकाम आणि उड्डाणपूल, नदीवरील पूल यांची बांधकामे सुरूच असल्याने सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे माणगाव शहरात वाहने थांबण्यासाठी जागा किंवा वाहनतळ नसल्याने प्रवासी थांबत नाहीत. ही वाहने थांबत नसल्याने व्यावसायिकांच्या व्यावसायावर दुष्परिणाम होत असून व्यापार ठप्प झाला आहे. रस्त्यावर चालणे देखील मुश्किल झाले आहे. त्यामुळे गिर्हाईक देखील दुकानात येत नाही अशा तक्रारी व्यापारी करीत आहेत.
माणगाव शहरातील महामार्गाचे रुंदीकरण किंवा चौपदरी करण झाले नाही. हातगाड्या आणि टपरीधारक यांनी महामार्ग व्यापून टाकल्याने रहदारीचला अडथळा निर्माण झाला आहे. सर्व्हिस रोड आणि बायपास रस्ता नसल्याने शहरात वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. कचेरी मार्ग,मोर्बा मार्ग, निजामपूर मार्ग आणि बामणोली या मार्गावर दररोजच्या दररोज वाहतूक कोंडी होत असते. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलिसांची कमतरता आहे. याचाही परिणाम वाहतूक कोंडीवर होत आहे. या वाहतूक कोंडीने माणगाव शहर वाहतूक कोंडीचे शहर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात बदनाम होत आहे. माणगाव शहरात वाहन आल्यावर ते एक ते दोन तास अडकून पडते. त्यामुळे प्रवाशांचा नाहक वेळ वाया जातो. या कारणांमुळे काही प्रवासी पूणे आणि कोल्हापूर मार्गे कोकणात जातात. त्यामुळे येथील बायपासचे काम तातडीने सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे.
ही माणगाव शहरातील वाहतुकीची कोंडी तात्पुरती दूर करण्यासाठी पोलिसांनी २५ डिसेंबर ते २ जानेवारी या ८ दिवसांसाठी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी उपाय योजना केल्या आहेत. मात्र त्यांना यश मिळाले नाही. हा सुट्ट्यांचा हंगाम आणि काळ असल्याने मोठ्या प्रमाणावर कोकणातील निसर्गरम्य स्थळे पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक येत आहेत. कोकणात आणि श्रीवर्धन येथे जाण्यासाठी एकच मार्ग हा माणगाव शहरातून आहे. येथील बायपासचे काम तातडीने झाल्यास माणगाव शहरातील वाहतुकीच्या कोंडीतून प्रवासी आणि माणगाव मधील नागरिकांची सुटका होईल असे असा दावा प्रवासी संघटनेने केला आहे.