अण्णा साबळे यांच्या पुढाकाराने प्रादेशिक परिवहन कार्यालय माणगांव तालुक्यात
मुगवली येथील स्वतःच्या जागेत २२ जानेवारी रोजी होणार पहिले शिबिर

प्रतिनिधी – अरुण पवार ( माणगाव ) गेली अनेक वर्षे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे शिबिर माणगाव येथील विविध ठिकाणी सुरू होते. याबाबत रायगड प्रतिबिंब या न्युज पोर्टलने ११ डिसेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध करुन आवाज उठविला होता तसेच येथील सामाजिक कार्यकर्ते आणि माणगाव तालुका रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष संजय अण्णा साबळे यांच्या दहा वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर येत्या २२ जानेवारी रोजी माणगाव जवळील मुगवली येथील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाजवळ हे शिबिर स्वतःच्या आणि आपल्या हक्काच्या जागेत सकाळी १० वाजता सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण यांनी दिली. हे शिबिर कायमस्वरूपी मुगवली येथील जागेत नियमितपणे सुरू होणार असल्याने रिक्षाचालक, मालक आणि वाहतूकदारांनी आनंद व्यक्त केला आहे
.
हि जागा मिळविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय अण्णा साबळे यांनी गेली दहा वर्षे पाठपुरावा केला. त्यासाठी खासदार सुनील तटकरे आणि रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी सहकार्य केले. सध्या हे कार्यालय तात्पुरते सुरू करण्यात येणार असून येथे एका वर्षात इमारत बांधकाम झाल्यावर कायमस्वरूपी पेण उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. यांचा लाभ रायगड जिल्ह्यातील तब्बल ११ तालुक्यातील वाहनचालक आणि मालक यांना होणार आहे. माणगाव हे मध्यवर्ती जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने पोलादपूर, महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन, तळा, रोहा आणि माणगाव या तालुक्यातील सर्व प्रकारच्या वाहनचालकांना होणार आहे. उर्वरित तालुक्यातील वाहनचालकांना पनवेल आणि पेण येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात लाभ घेता येणार आहे.
गुरुवार दिनांक १६ जानेवारी रोजी मुगवली येथे परीवहन अधिकारी कोळी यांनी जागेची पाहणी केली असता समाधान व्यक्त केले. त्यावेळी रिक्षा चालकांनी संबंधित जागेची साफसफाई केली. हि जागा ५ एकर असून त्यामध्ये वाहन ट्रॅक आणि इमारत बांधकाम झाल्यावर कायमस्वरूपी परीवहन कार्यालय सुरू करण्यात येणार आहे.
यापूर्वी आर.टी.ओ. कॅम्प माणगावात विविध ठिकाणी भरवण्यात येत होते. त्यामुळे अनेकांची शोधण्यासाठी धावपळ आणि गैरसोय होत होती. तसेच अनेक महत्त्वाच्या कामासाठी अनेकांना पेण येथे जावे लागत होते. आता मात्र स्वतःच्या मालकीच्या जागेत हे कामकाज तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात येणार आहे. हि जागा गट क्रमांक ७३ मध्ये असून या कार्यालयासाठी सुमारे १६ कोटी रुपयांची तरतूद ना. भरत गोगावले आणि ना. आदिती तटकरे यांनी केली आहे.