सह्याद्री पतसंस्थेची आर्थिक स्थिती भक्कम ; सभासदांनी अफवांवर विश्वास ठेवू नये
गैर व्यवहार करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार पत्रकार परिषदेत चेअरमन ॲड. राजीव साबळे यांची माहिती

प्रतिनिधी – अरुण पवार ( माणगांव ) माणगांव तालुक्यातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या सह्याद्री ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था या पतसंस्थेची आर्थिक स्थिती भक्कम असून ज्यांनी आर्थिक घोटाळा केला आहे, त्यांच्यावर कायदेशीर आणि पोलीस कारवाई करून गैर व्यवहार झालेली सर्व रक्कम तातडीने वसूल करण्यात येईल. या पतसंस्थेचा कारभार अत्यंत पारदर्शक असून सभासद, ठेवीदार यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन या पतसंस्थेचे चेअरमन ऍड. राजीव साबळे यांनी माणगांव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.
सह्याद्री पतसंस्थेच्या एकूण सहा शाखा आहेत. त्यापैकी गोरेगाव शाखेत शाखाधिकारी व अन्य तिघांनी मिळून सोने तारण कर्जामध्ये गैरव्यवहार करून पतसंस्थेची फसवणूक केली आहे. याबाबत गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून गैरव्यवहार करणाऱ्या प्रदीप भोनकर या आरोपीला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी अतुल चेरफळे याला तपासा साठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच अन्य संशयितांची पोलीस चौकशी सुरू आहे. या प्रकरणात कुणाचीही गय केली जाणार नसून संबंधित गैर व्यवहार करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. संशयित आरोपी यांच्याकडून कायदेशीर कारवाई करून सुमारे ४० लाख रुपये वसूल करण्यात येणार आहेत. त्यांची स्थावर मालमत्ता जप्त करण्यासाठी कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे संस्थेच्या संबंधित ठवीदारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन चेअरमन ऍड. राजीव साबळे यांनी पत्रकार परिषदेत केले.
सह्याद्री पतसंस्थेच्या सभासदांनी सुमारे ३३ कोटी रुपयाच्या ठेवी ठेवून पतसंस्थेवर गाठ विश्वास दाखविला आहे. या ठेवीमध्ये दररोज वाढ होत आहे. ठेवीमधील सुमारे २६ कोटी कर्ज वितरित करण्यात आले आहे. पतसंस्थेची एकूण ४३ कोटी रुपयांचा भाग भांडवल आहे. हे भाग भांडवल विविध राष्ट्रीयकृत बँकेत सुरक्षित ठेवण्यात आले आहे. दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत केवळ २% थकबाकी असून तब्बल ९८% कर्ज वसुली झाली आहे. गतवर्षी पतसंस्थेला ४० लाख रुपयांचा नफा झाला होता. या आथिर्क वर्षांमध्ये तो दुप्पट होऊन ८० लाख झाला आहे. कर्ज वसुलीसाठी कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे कर्ज वसुली चांगल्या प्रमाणात झाली आहे. या पतसंस्थेला सातत्याने दरवर्षी आर्थिक अंदाज पत्रकानुसार चढता क्रमाने नफा झाला असून ऑडिटचे ‘अ’ दर्जाचे मानांकन मिळाले आहे. या पतसंस्थेत अतिशय पारदर्शक कामकाज सुरू असून कोणालाही शंका असल्यास कार्यालयात जाऊन खातरजमा करावी आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन ऍड. राजीव साबळे यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला पतसंस्था चेअरमन ऍड. राजीव साबळे, व्हाईस चेअरमन चंद्रशेखर देशमुख, संचालक वैभव साबळे, शैलेश भोनकर, सूर्यकांत काळे, प्रकाश तळकर, दिलीप शेठ, सचिन शेडगे उपस्थित होते.