Join WhatsApp Group
आपला जिल्हा

महसुल खात्याच्या आशिर्वादाने ; माणगांव तालुक्यात माती माफियांचा धुडगुस

हाय वे लगत भराव होत असताना तलाठी, मंडळ अधिकारी यांचा जाणिवपुर्वक दुर्लक्ष

गोरेगांव –  माणगांव तालुक्यातील तहसिल कार्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे शासनाने दिलेले उद्दीष्ट्य साध्य करण्यात महसुल खाते प्रत्येक वर्षी कमी पडताना दिसून येत आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी विट उत्पादन, जांभा दगड खाणी, दगड खाणी, स्टोन क्रशर सोबतच माती उत्खनन व भरावाचे काम मोठ्या प्रमाणात चालु आहेत. या वर्षीतर संपुर्ण रायगड जिल्ह्यात रॉयस्टी इश्यु करण्यात आलेली नाही असे असताना माणगांव तालुक्यात मात्र बिनधास्तपणे  माती माफिया राजरोसपणे दिवसरात्र उत्खनन करीत जागोजागी  भराव करत आहेत परंतु तलाठी मंडळ अधिकारी यांना याची कल्पना देऊन सुद्धा हे निवांत खुर्च्या गरम करताना दिसत आहेत. या उत्खनन – भरावाबाबत  तलाठी यांना तक्रार करुन सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई त्यांच्याकडून करण्यात येत नाही. उलट कुठे भराव होतोय ? असा प्रश्न तलाठीच उपस्थित करत असतात.

विट उत्पदकांच्या जागेवरील विटा आणि मातीचे पंचनामे करण्यास चालढकल

एक वर्षापुर्वी विनापरवाना, विना रॉयल्टी विट उत्पादकांनी विट उत्पादन चालु करुन विक्री चालु केल्याची बातमी प्रसारीत करण्यात आली होती. सोबतच पत्रकार प्रसाद गोरेगांवकर यांनी तक्रार अर्ज देत सदर विट उत्पादकांच्या जागेवरील कच्च्या पक्क्या विटांचे तसेच मातीचे पंचनामे करुन अहवालाच्या आधारावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी असे पत्र दिले होते परंतु अद्यापपर्यंत महसुल खात्याकडून या विट उत्पादकांच्या जागेवरील विटांचे ना पंचनामे करण्यात आले ना कोणतीही कारवाई करण्यात आलेली  दिसून येत आहे.

अवैध गौणखनिज उत्खनन  भराव प्रकरणी बोजा चढविण्यास टाळाटाळ?

गतवर्षी तालुक्यात मोठ्या प्रमाणात माती उत्खनन व भरावाबाबत तक्रारी दाखल झाल्यानंतर बऱ्याच जणांना तहसिलदारांकडून दंडात्मक कारवाईच्या नोटीसा पाठविण्यात आल्या  या नोटीसला उत्खनन किंवा भराव कर्त्यांकडून  कोणतेही उत्तर महसुल विभागाला आलेले नाही. मग प्रश्न असा पडतो की  पाठवलेल्या नोटीसला उत्तर मिळालेले नसताना तहसिलदार यांनी पुढे बोजा चढविण्याचे आदेश का नाही दिले ?  पत्रकार यांनी याबाबत पाठपुरावा घेतल्यानंतर लोणेरे मंडळ अधिकारी क्षेत्रातील उसरघर येथील भराव प्रकरणी ४ वेगवेगळ्या जणांना दंडात्मक रक्कमेचे केवळ आदेश देण्यात आले आहेत. आदेश बजावून एक ते सव्वा वर्ष जास्त कालावधी उलटून देखील बोजा चढविण्यात आलेला नाही. खरंतर आदेश केल्यानंतर एका दिवसात बोजा चढविणे क्रमप्राप्त आहे परंतु तसे का झाले नाही असा प्रश्न उद्भवत आहे.

प्रांताधिकारी, तहसिलदार यांच्याकडून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला नाही तर आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली  

निजामपुर विभागातील कोस्ते बुद्रुक येथील एकाच ठिकाणी लागून असलेल्या दोन गट क्रमांकावर भराव करण्यात आलेला आहे या भरावाबाबत तहसिलदार यांनी दोन्ही गट क्रमांकावर बोजा चढविण्याऐवजी एकाच गट क्रमांकावर बोजा चढविला आहे. याबाबत फेर चौकशी व्हावी यासाठी देखील कोकण आयुक्तापर्यंत पत्रकार प्रसाद गोरेगांवकर यांनी पत्रव्यवहार केला आहे परंतु इथे देखील कारवाई सोडा साधी चौकशी महसुल विभागाने  अद्यापर्यंत केली नाही.   या कोस्ते बु. येथील भराबाबत  गोरेगांवकर यांनी  कोकण आयुक्तांना पत्र दिल्यानंतर आयुक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयास पत्र दिले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयानी प्रांताधिकारी  तसेच तहसिल कार्यालयास पत्र देत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सात ते आठ महिन्यांपुर्वी दिले आहेत परंतु प्रांताधिकारी आणि तहसिल कार्यालयाकडून अजूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे प्रांताधिकारी, तहसिलदार यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला नाही तर आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये