उरणमध्ये २७ नोव्हेंबर पासून एनएमएमटीची सेवा सुरु ; वेळ, पैशांची होणार बचत
तब्बल ९ महिन्यांनी नवी मुंबई परिवहन सेवा (NMMT )ची सेवा सुरु ; विविध सामाजिक संघटना, संस्थाच्या पाठपुराव्याला यश.

प्रतिनिधी – विठ्ठल ममताबादे ( उरण ) फेब्रुवारी महिन्यामध्ये उरण तालुक्यातील खोपटे येथे झालेल्या भीषण अपघाता नंतर नवी मुंबईसाठी प्रवासाची जीवनरेखा ठरलेली ‘एनएमएमटी’ ची बससेवा नवी मुंबई परिवहन बस सेवेच्या व्यवस्थापनाने कामगारांची सुरक्षा आणि तोट्यात चालणारा मार्ग ठरवून अनिश्चित काळासाठी उरण मध्ये एनएमएमटीची सेवा बंद केली होती . याचा फटका उरणच्या प्रवाशांना बसला होता यामध्ये विशेषतः जेष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि कामगार यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे उरणकर प्रवाशांना आपले निश्चित ठिकाण गाठण्यासाठी धोकादायक खाजगी वाहतुकीचा आसरा घ्यावा लागला होता यामुळे वेळ आणि अधिकच्या खर्चाचा भार उरणकरांच्या खिशावर पडत होता. मात्र बुधवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२४ पासून उरण तालुक्यात एनएमएमटी ची बस सेवा सुरु होणार असल्याची माहिती नवी मुंबई परिवहन बस सेवेचे व्यवस्थापक योगेश कडूस्कर यांनी दिली. त्यामुळे जनतेत आनंदाचे वातावरण पसरले आहे.
उरण ते कोपरखैरणे, जुईनगर रेल्वे स्थानक, कळंबोली दरम्यानच्या ३०, ३१ आणि ३४ या क्रमांकाच्या मार्गावरील ‘एनएमएमटी’ची बससेवा परिवहन उपक्रमाकडून पूर्णपणे बंद करण्यात आली होती . या व्यवस्थेला पर्याय म्हणून प्रवाशी वर्गांनी रेल्वेला पसंती दिली होती मात्र उरण ते बेलापूर, नेरुळ मार्गावर उरण रेल्वे स्थानकातून एका तासाने लोकल सुटत आहेत. त्यामुळे नवी मुंबई, मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तासभर लोकलची वाट पहावी लागत होती. शिवाय उरण शहरातून रेल्वे स्थानक गाठण्यासाठी प्रवाशांना रिक्षाचे अधिकचे भाडे मोजावे लागत होते. या समस्येमुळे शहरातून आणि तालुक्यातील गावाजवळून जाणाऱ्या ‘एनएमएमटी’ मुळे प्रवास करणे अधिक सोयीचा होता. मात्र, बससेवा बंद झाल्याने नागरिकांना अनेक संकटांचा सामना करीत प्रवास करावा लागत होता. त्यामुळे ‘एनएमएमटी’ची बससेवा लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी उरणकर नागरिकांकडून केली जात होती. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस पक्ष,जनवादी महिला संघटना, उरण सामाजिक संस्था, जेष्ठ नागरिक संस्था, मॉर्निंग कट्टा ग्रुप यांच्यासह विविध सामाजिक संस्था, संघटना यांनीही एनएमएमटी सुरु करण्याबाबत पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. त्याला आता यश आले आहे.
अनेक वर्षांपासून उरण तालुक्यात सुरु असलेली एनएमएमटी बस सेवा दिनांक २२ फेब्रुवारी २०२४ पासून अचानक बंद करण्यात आली होती. सदरची बससेवा तात्काळ सुरु करण्याची मागणी उरण तालुक्यातील विविध सामाजिक संस्था, संघटनानी एनएमएमटी प्रशासनाकडे केली होती. नवीमुंबई महानगर पालिकेच्या परिवहन विभागाच्या वतीने उरण ते नवी मुंबई मार्गावर बस सेवा सुरु होती. जुईनगर ते उरण शहरासह तालुक्यातील कोप्रोली, वशेणी व पिरकोन या मार्गांवर चालणाऱ्या ३०, ३१ व ३४ क्रमांक असलेल्या एनएमएमटी बस दिनांक २२ फेब्रुवारी २०२४ पासून अचानकपणे बंद करण्यात आल्या होत्या . त्यामुळे उरण तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. एनएमएमटी बंद झाल्याने व्यवसाय, नोकरी, धंदा, कार्यालयीन व दैनंदिन कामासाठी मुंबई, ठाणे, नवीमुंबईकडे जाणाऱ्या हजारो प्रवाशांचे हाल होत आहेत. त्याच प्रमाणे आर्थिक नुकसान देखील होत आहे. याशिवाय दहावी, बारावी तसेच विविध कोर्स तसेच उच्च शिक्षण घेण्यासाठी उरण तालुक्यातील विद्यार्थी मुंबई, नवी मुंबई मध्ये शिकण्यासाठी मोठया प्रमाणात जात असतात. या सर्वांसाठी एनएनएमटी बसने प्रवास करणे सुरक्षित एकमेव व उत्तम पर्याय होते. मात्र एनएमएमटी बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे मोठया प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. उरण मध्ये रेल्वे सेवा सुरु झाली आहे मात्र रेल्वेच्या फेऱ्या नवी मुंबई साठी एक – एक तासाने आहेत. रेल्वे सेवेच्या नवी मुंबईत जाण्यासाठी व नवी मुंबई मधून परत उरण मध्ये येण्यासाठी फेऱ्या कमी असल्यामुळे व वेळेत रेल्वे सेवा नसल्याने रेल्वे सेवेचा प्रवाशांना योग्य तो फायदा होत नाही.रात्री १० नंतर रेल्वे सेवा बंद असल्यामुळे विद्यार्थी सुरक्षित प्रवास करू शकत नाही. आणि रेल्वे रात्री मिळाली नाही तर विद्यार्थी व प्रवाशांना नवी मुंबई मध्ये रात्री अडकून राहावे लागते. रेल्वे सेवेचा विद्यार्थ्यांना कोणताच फायदा नाही. त्यामुळे उरण तालुक्यात एनएमएमटी तात्काळ सुरु करण्याची मागणी सोनारी येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश तांडेल यांनी देखील केली होती. त्यांच्याही मागणीला आता यश आले आहे.
उरण तालुक्यात एनएमएमटीची बस सेवा सुरु व्हावी यासाठी आम्ही पत्रव्यवहार केला. पाठपुरावा केला. आता आमच्या मागणीला यश आले आहे. आता जनतेचा प्रवास सुलभ, आनंददायी, सुरक्षित होणार आहे. पैशेची व वेळेची सुद्धा बचत होणार आहे. उरण करांसाठी हा महत्वाचा निर्णय आहे. आम्ही एनएमएमटी प्रशासनाचे आभार मानतो. एनएमएमटी ने ही सेवा कायमची सुरळीतपणे चालू ठेवावी तसेच प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या व उत्तम सुविधा मिळाव्यात हिच आमची प्रमुख मागणी आहे.
– कॉम्रेड भूषण पाटील
माजी विश्वस्त जेएनपीटी, सामाजिक कार्यकर्ते उरण.
———————————————————-
बंद असलेली सेवा विविध सामाजिक संस्था, संघटना, जनता यांच्या आग्रहास्तव सुरु केली आहे. याचा फायदा प्रवाशी वर्गाला होणार आहे. प्रवाशी वर्गांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती.
– योगेश कडूस्कर, परिवहन व्यवस्थापक, नवी मुंबई परिवहन सेवा