
माणगाव – वाघरे आणि शिपुरकर इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी नवरात्रोत्सव मोठ्या उल्हासात, प्रचंड उत्साहात आणि आनंद जल्लोषात साजरा केला. सर्व विद्यार्थ्यांनी सारे देहभान विसरून गरबा नृत्य सादर केले. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. शिक्षकही या विद्यार्थ्यांच्या आनंदात सहभागी झाल्याने त्यांचाही आनंद द्विगुणित झाला.
सतत अभ्यासात गुंतलेले हात आणि पाय आजच्या गरबा नृत्यासाठी थिरकले होते. अभ्यासात रमलेले मन टवटवीत झाले. त्यांना या उत्सवाने नवी उमेद, उर्जा आणि उर्मी निर्माण झाली. अभ्यासाचा ताणतणाव विसरून विद्यार्थी सुरताल आणि लयबद्ध संगीताचा ठेका धरत एकाच तालासुरात नृत्य करत होते. तेव्हा आपण एक मोठा संगीत आणि नृत्य आविष्कार पहात आहोत असे जाणवत होते. एकूणच त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.
हि मजा आणि मस्ती त्यांच्या कायम स्मरणात राहील हे नक्की त्यामुळे अशा प्रकारचे सण आणि उत्सव साजरे करुन आपल्या परंपरा जपणे कर्तव्य ठरते. त्यातूनच नवीन प्रेरणा आणि उर्जा मिळत राहते. ही उमंग घेऊन जातील तेव्हा पून्हा एकदा आकाशात उंच झेप घेऊन उराशी बाळगलेले आईवडील यांचे स्वप्न साकार करण्यासाठी जोरदार प्रयत्न करतील. त्यासाठी त्यांच्या कोवळ्या पंखांमध्ये अधिक आणि सातत्याने बळ देण्याचे कर्तव्य गुरू, शिक्षक नव्या उमेदीने करतील असा आत्मविश्वास वाटतो.
राष्ट्रीय खेळाडू तनय उतेकर आणि सार्थक म्हामुणकर या खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गृप नृत्यासाठी इयत्ता आठवी आणि कुमारी शिर्के हिला उत्कृष्ट नृत्य आणि वेशभूषेसाठी बक्षीसे देण्यात आली. तेव्हा विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला यानंतर नवरात्रौत्सवाच्या सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि पालकांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.