ज्ञानदेव पवार यांनी घेतली मा. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांची भेट ; राष्ट्रवादी शरद पवार पक्षात लवकरच करणार प्रवेश
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छूक

प्रतिनीधी – महेश शेलार ( माणगाव ) रायगड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती तसेच माणगावचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते जितेंद्र आव्हाड यांची नुकतीच मुंबई येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या भेटीत श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात इच्छूक असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्ञानदेव पवार हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. ग्रामपंचायत सदस्य, माणगावचे सरपंच, रायगड जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती त्यानंतर माणगाव नगराध्यक्ष म्हणून चांगल्या प्रकारे सामाजिक विकास कामे करून जनसामान्यांमध्ये आपली छाप पाडली आहे. राजकारणात धाडसी निर्णय घेण्यात मातब्बर आहेत. ते कुणबी समाजाचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात ६० टक्के कुणबी समाज विखुरलेला आहे. त्यांना एकत्र करण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. गेले २५ वर्षे या मतदार संघात कुणबी समाजाचा आमदार नसल्याने समाजात नाराजीचा सूर पहावयास मिळत आहे. त्यामुळे यावेळी आपल्या समाजाचाच आमदार करण्यासाठी प्रयत्न करायचा असा चंग बांधलेला आहे. कुणबी समाजाचा प्रत्येक निवडणुकीत केवळ वापर केला जातो. मात्र ह्या समाजाच्या मागण्या अनेक वर्षे झाली तरी पुर्ण न झाल्याने उपेक्षितच राहिला आहे अशी भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे यावेळी कुणबी समाजाच्या उमेदवाराच्या पारड्यात मतं टाकायचे अशी खुणगाठ बांधली आहे.
शरदचंद्र पवार हे नवीन तरुण चेहऱ्यांना संधी देण्यासाठी अनुकुल आहेत. महाविकास आघाडीत श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ हा पारंपरिक पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. या मतदार संघांतून पक्षाचे चार वेळा आमदार निवडून आलेला असल्याने हि जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला सोडण्यात आली आहे असे सध्या तरी दिसत आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ हा शरद पवार यांच्या वाट्याला गेल्यावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, काँग्रेस पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष असे चार प्रमुख पक्ष एकत्र लढाई लढल्यास हि लढत चुरशीची होऊ शकते. हे सर्व पक्ष धर्मनिरपेक्ष असल्याने मुस्लिम आणि मागासवर्गीय तसेच कुणबी समाजाने निर्धार केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजयी होऊ शकतो असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
जातीयवादी शक्तींशी हातमिळवणी करणाऱ्यांना आणि वारा येईल तशी पाठ फिरवून पक्षाशी फारकत घेणाऱ्यांना यावेळी जनता जनार्दन धडा शिकवेल आणि २५ वर्षांची घराणेशाही आणि हुकूमशाही मतदार संघातील मतदार संपवतील असा विश्वास ज्ञानदेव पवार यांनी व्यक्त केला आहे. शरद पवार, अ.र. अंतुले, उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांचीही मोठी राजकीय ताकद येथे आहे. यांचा कितपत फायदा होतो यावर सर्व राजकीय गणिते अवलंबून आहेत.
या मतदार संघात अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसने मजबूत पाया घातला आहे. मात्र शिंदे सेना आणि भाजप यांची ताकद नगण्य आहे. याची साथ राष्ट्रवादीला कितपत मिळेल यावर अवलंबून आहे. तरीही आजच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. मात्र ज्ञानदेव पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळाली तर चमत्कार होऊ शकतो असे बोलले जात आहे.