उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का!!
श्रीवर्धन मतदार संघ क्षेत्रसंघटक रवींद्र लाड यांचा राजीनामा....

प्रतिनिधी – संतोष उध्दरकर ( म्हसळा ) लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत अस्वस्थता वाढू लागली आहे. रायगड रत्नागिरी मतदार संघात उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला लोकसभेत पराभव पहावा लागला. त्यानंतर श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीचे अनिल नवगणे पराभूत झाले. दरम्यान आता संघटनात्मक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्याचे पडसाद आता उमटू लागले असून उबाठा शिवसेनेचे श्रीवर्धन मतदार क्षेत्र संघटक रवींद्र लाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असुन जिल्हा संपर्कप्रमुख नागेंद्र राठोड यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला आहे.
रवींद्र लाड यांचे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात चांगले संघटन आहे. लोकसभा निवडणुकीत अनंत गीते आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल नवगणे यांच्यासाठी लाड यांनी प्रचारात झोकुन दिले होते. रविंद्र लाड यांच्या राजीनामा मुळे श्रीवर्धन, म्हसळा मध्ये राजकीय घडामोडी बदलणार ही गोष्ट नाकारता येत नाही,लाड हे गेली ४५ वर्षे शिवसेनेत राहुन बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन म्हसळा तालुका संघटनेत प्रामाणिक काम केले असून त्यांनी तालुका प्रमुख, सभापती, उपसभापती पदावर काम केले आहे. “वैयक्तिक कारणामुळे मी पक्षाला वेळ देऊ शकत नाही, असे म्हणत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे.