तनय उतेकरची स्विडन येथे जागतिक स्पर्धेसाठी निवड
तनय उतेकरला राज्य क्रीडा विभागाकडून अर्थिक मदत मिळवून देण्याचे ना. आदिती तटकरे यांचे आश्वासन

प्रतिनिधी – अरुण पवार ( माणगाव ) माणगाव येथील शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या शिपुरकर आणि वाघरे इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी तनय ज्ञानेश्वर उतेकर याची आईस स्केटिंग संघात राष्ट्रीय पातळीवर निवड झाल्याने तो भारतीय संघातून प्रतिनिधित्व करण्यासाठी जागतिक वर्ल्ड कप स्पर्धेसाठी स्विडन येथे जाणार आहे. त्यासाठी महिला आणि बालकल्याण मंत्री ना. आदिती तटकरे यांनी कौतुक करुन राज्य क्रीडा विभागाकडून अर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले.
तनय याने आईस स्केटिंग हॉकी या खेळाच्या सरावासाठी रायगड जिल्ह्यात कुठेही सुविधा नसतानाही आपला शाळेच्या व्हरांड्यात आणि टेरेसवर करुन उज्ज्वल यश मिळविले. येथील शाळा व्यवस्थापन, प्रशिक्षक संजय गमरे, चेअरमन अरुण पवार, मुख्याध्यापिका मनिषा मोरे, क्रीडा शिक्षक प्रतिक सर यांनी तनय उतेकर याला नेहमीच प्रोत्साहन दिले. त्यामुळे त्यांची भारतीय संघात राष्ट्रीय पातळीवर निवड झाली. आता भारतीय संघ १ नोव्हेंबर २०२४ रोजी जागतिक स्पर्धेसाठी स्विडन येथे जाणार आहे.
भारतीय संघ स्विडन येथे जाणे आणि येण्यासाठी खर्च करणार नसल्याचे समजल्याने तनयच्या पालकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते बांबू खानविलकर यांच्या सहकार्याने ना. आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांची भेट सोमवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी घेण्यात आली. दोघांनीही तनय उतेकर याचे तोंड भरून कौतुक करुन पाठीवर शाबासकीची थाप मारत शुभेच्छा दिल्या.
ना. आदिती तटकरे यांच्या समोर स्विडन येथे जाण्यासाठी अर्थिक अडचण येत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी लगेचच राज्य क्रीडा विभागात संपर्क साधून तनय उतेकर यास तातडीने अर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले. अर्थिक मदत मिळणार असल्याने तनय उतेकरला मोठा दिलासा मिळाला आहे.