राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे ज्ञानदेव पवार यांची उमेदवारी निश्चित
आता नाही तर कधीही नाही, सर्व समाज बांधवांना आवाहन

प्रतिनिधी – अरुण पवार ( माणगाव ) माणगाव शहराचे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांची श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून महविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे उमेदवारी निश्चित झाल्याने त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यात आला आहे. आता नाही तर कधीही नाही असे भावनिक आवाहन मतदार संघातील सर्व घटकांतील समाज बांधवांना केले आहे.
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ हा या पुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २००९ पासून बालेकिल्ला समजला जात असे. परंतु या पक्षातील ४० आमदारांनी गद्दारी करून दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उदयाला आला. २००९ पूर्वी हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला होता. मात्र आघाडीच्या वाटाघाटीत हा मतदारसंघ तुतारीला सोडण्यात आला आहे. त्याबदल्यात कर्जत मतदारसंघ शिवसेनेला देण्यात आला आहे. त्यामुळे या मतदारसंघात ज्ञानदेव पवार यांना महा आघाडी तर्फे उमेदवारी देण्यात येणार आहे असे खात्रीलायक वृत्त आहे.
महविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना, काँग्रेस, शेकाप, रिपब्लिकन पक्ष आदी छोट्या मोठ्या पक्षांचा पाठिंबा मिळणार आहे. तसेच कुणबी, मराठा, मुस्लिम, मागासवर्गीय, आदीवासी आणि इतर समाजातील वंचित, सोशिक घटकांचा देखील पाठिंबा मिळणार असल्याने माझा श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील विजय निश्चित झालेला आहे असा आत्मविश्वास ज्ञानदेव पवार यांनी व्यक्त केला आहे.
२५ वर्ष सत्ता असूनसुद्धा मुंबई गोवा महामार्ग झाला नाही. माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, तळा, रोहा या पाचही तालुक्यात रोजगार उपलब्ध करून देण्यात आला नाही, माणगाव येथे ट्रामा हॉस्पिटल उभारले नाही, कोकण विभागीय क्रीडा संकुलाची केवळ घोषणा करण्यात आली, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ बारामती सारखा करणार ही घोषणा हवेतच विरली, उत्तम आरोग्य सेवा नसल्याने अनेकांना वाटेतच मृत्यू ओढवला जात आहे, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत असून त्यांची दयनीय अवस्था झाली आहे असे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले गेले नाहीत. केवळ आपल्या काही मर्जीतील आणि गावांतील रस्ते केले तर काही समाजाला सांभाळण्यासाठी समाज मंदिर बांधली गेली आहेत. आरोग्य केंद्र बांधली परंतु वैद्यकीय अधिकारी कार्यरत नाहीत अशी अवस्था आहे असा आरोप ज्ञानदेव पवार यांनी केला आहे.
शरद पवार हे सर्व सामान्य माणसाला न्याय देणारे नेतृत्व आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मराठी माणसाला आणि अल्पसंख्यांकांना न्याय मिळवून देणारे आहेत. काँग्रेस पक्ष सर्व धर्म समभाव जोडणारा पक्ष आहे. शेकापचे जयंत पाटील हे शेतकरी आणि कामगार यांचा आवाज बुलंद करणारे नेते आहेत. हे सर्व नेते संविधानाला वाचवण्यासाठी संघर्ष करीत आहेत. जातीयवाद पसरवणारे नाहीत असा दावा ज्ञानदेव पवार यांनी केला.
कुणबी समाजाचे नेते असणाऱ्या ज्ञानदेव पवार यांनी सांगितले की, कुणबी समाजाची प्रत्येक वेळी दिशाभूल करत आपली राजकीय पोळी भाजून घेतली आहे. केवळ समाज भवन बांधून उपयोग नाही तर त्यांच्या हाताला काम मिळावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कुणबी बांधवांनो आता तरी जागे व्हा आणि आपल्या मातीतील माणसाला मतं देवून सर्वांगीण विकास करा असे आवाहन ज्ञानदेव पवार यांनी माणगाव तालुक्यातील सभांमध्ये केले.