श्रीवर्धन मतदार संघातील निवडणुक होणार रंगतदार ; निवडणुकीच्या रिंगणात सहा सहा उमेदवार ?

गोरेगांव – रायगड जिल्ह्यातील प्रतिष्ठित असलेल्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात येत्या विधानसभा निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील निवडणुकीसाठी आत्तापर्यंत एक नाही, दोन नाही तर तब्बल सहा सहा उमेदवार रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या श्रीवर्धन मतदार संघातील निवडणुक निश्चितच रंगतदार होणार आहे.
श्रीवर्धन मतदार संघ खरंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आणि खऱ्या अर्थाने सुनिल तटकरे यांचाच बालेकिल्ला कारण श्रीवर्धन मतदार संघातून आत्तापर्यंत तटकरे कुंटुबियांने तीन वेळा बाजी मारलेली आहे. यामध्ये राष्ट्रवादी अजित दादा पवार गटाकडून कु. अदिती तटकरे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात सुनील तटकरे यांचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व मोडून काढण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसल्याचे दिसून येते. परंतु आदिती तटकरे यांच्या विरोधात तसाच तुल्यबळ उमेदवार नसल्याचे चित्र आहे. मात्र स्वतः राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा (शरद पवार गट) शरद पवार लक्ष देणार असल्याने येत्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील निवडणुक ही रंगतदार चुरस पाहायला मिळणार एवढे नक्की असले तरीही अजुन राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवार जाहीर झालेला नाही परंतु शरद पवार गटाकडून माजी आमदार अवधुत तटकरे आणि माणगांवचे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार हे इच्छुक असल्याची चर्चा आहे.
विद्यमान आमदार व महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या विरोधात कोण निवडणूक लढवणार याची चर्चा सुरू असताना माजी आमदार अवधुत तटकरे आणि माणगांवचे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्या नावाच्या चर्चेसोबतच महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठा गटाचे रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे इच्छुक असल्याचे समजते सोबतच आय कॉंग्रेस कडून राजाभाऊ ठाकूर यांची नावे समोर येत आहेत शिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून फैझल पोपेर यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली आहे. तर बळीराजा सेना पक्षाकडून कृष्णा कोबनाक यांचे नांव चर्चेत आहे. त्यामुळे श्रीवर्धन विधानसभा निवडणुक ही रंगतदार होणार आहे.