कुणबी नेते ज्ञानदेव पवार यांचा शरद पवार पक्षात प्रवेश
शरद पवार यांची तटकरेंना शह देण्यासाठी राजकीय खेळी

प्रतिनिधी – अरुण पवार ( माणगांव ) रायगड जिल्हा कुणबी समाजाचे अध्यक्ष, रायगड जिल्हा परिषद शिक्षण आणि आरोग्य माजी सभापती आणि माणगाव नगरपंचायतीचे सभापती तरुण तडफदार नेते ज्ञानदेव पवार यांनी शिवसेना शिंदे पक्षाला जय महाराष्ट्र करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात मुंबई येथे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. शरद पवार यांनी तटकरे यांना शह देण्यासाठी ही राजकीय खेळी करून महायुतीला धक्का दिला आहे. त्यापूर्वी ज्ञानदेव पवार यांनी यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. महायुतीच्या उमेदवाराला हादरा बसला आहे. शरद पवार यांच्या खेळीने त्यांचे नवीन पक्षात जोरदार आणि जंगी स्वागत करुन पुढील वाटचालीसाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करताना ज्ञानदेव पवार यांना श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून पक्षाची उमेदवारी मिळणार असल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साह संचारला आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ हा शरद पवारांच्या वाट्याला आला आहे. या मतदारसंघात ज्ञानदेव पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या विद्यमान आमदार आणि मंत्री आदिती तटकरे किंवा अनिकेत तटकरे यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडाळी करून वेगळी चूल मांडणाऱ्या मंत्री आणि आमदार यांच्या विरोधात सक्षम उमेदवार उभे करून त्यांना धडा शिकवला जाईल. तसेच बंडखोरांना पराभूत करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील. ज्ञानदेव पवार यांना सर्व प्रकारची रसद पुरवली जाईल. त्यांना राजकीय ताकद दिली जाईल. तटकरे यांच्या विरोधात उमेदवारी करण्याचे धाडस आणि धमक दाखवल्या ज्ञानदेव पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पाठ थोपटून कौतुक केले आहे. यावेळी खुद्द शरदचंद्र पवार यांनी ज्ञानदेव पवार यांना राजनैतिक सल्ला आणि राजकीय कानमंत्र दिला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अधिक उत्साह वाढलेला दिसून येत आहे.
ज्ञानदेव पवार यांच्या या पक्ष प्रवेशामुळे खळबळ उडाली आहे. या मतदारसंघात शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहीत पवार आदी मान्यवर यांच्या माध्यमातून प्रचार सभा होणार आहेत. तसेच शिवसेना, काँग्रेस आणि शेकाप या पक्षांच्या जाहीर प्रचार सभा होणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच लढत होईल. महायुतीतील नाराजीचा मला फायदा होईल असे ज्ञानदेव पवार यांनी सांगितले.
ज्ञानदेव पवार यांना उमेदवारी देण्यात आल्यास तुल्यबळ लढत होणार आहे. महायुतीच्या विरोधात कोणीही उमेदवार उभा केला तरी आमचाच विजय निश्चित होणार आहे. आम्ही विकास कामांच्या जोरावर मतं मागणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. ज्ञानदेव पवार यांची उमेदवारी महाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घेऊन लवकरच जाहीर करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले आहे. तत्पूर्वी प्रचाराच्या कामाला लागा, पक्षसंघटना वाढवा असे आदेश ज्ञानदेव पवार यांना देण्यात आले आहेत असे खात्रीलायक समजते.