
अलिबाग : श्री विभूषित जगतगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्य महाराज दक्षिण पीठ नाणिजधाम यांच्या अंतर्गत दि.१७ ऑगस्ट रोजी श्री संप्रदाय चौल सेवा केंद्राच्या वतीने श्री लीलामृत ग्रंथ एक दिवसीय पारायण सोहळा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमासाठी चौल परिसरातील अनेक भक्त गण उपस्थित होते. जगतगुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या वतीने रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण तसेच महामार्गावरील अपघात ग्रस्तांसाठी मोफत ॲम्बुलन्स सेवा अशा अनेक प्रकारच्या शिबिरांचे आयोजन देखील करण्यात येत असतात.
अलिबाग तालुक्यातील चौल गावातील रामेश्वर मंदिरात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नरेंद्राचार्य महाराज लिखित २१ अध्याय असलेल्या लीलामृत ग्रंथाचा एक दिवसाचा पारायण आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात चौल विभागातील अनेक महिला व पुरुष भाविकांनी सहभाग घेतला होता. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सेवा समितीच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. आरती व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.