करंजा गावातील ११ वर्षीय मयंक म्हात्रे यांनी रचला पुन्हा नवा इतिहास
घारापुरी ते करंजा जेट्टी १८ किलोमीटरचा प्रवास ५ तास २९ मिनिटात समुद्रात पोहून केला विक्रम

प्रतिनिधी – विठ्ठल ममताबादे ( उरण ) तालुक्यातील करंजा येथील सुपुत्र, प्रसिद्ध ११ वर्षीय जलतरणपटू मयंक म्हात्रे याने मंगळवार दिनांक ३ डिसेंबर २०२४ रोजी मध्यरात्री १:०४ मिनिटाने प्रसिद्ध घारापुरी बंदर येथून समुद्रातील लाटांना आव्हान देत रात्रभर सतत पोहत सकाळी ७ वाजण्याच्या अगोदरच करंजा जेट्टी येथे पोहोचुन इतिहास रचला आहे. उरण तालुक्यातील घारापुरी बंदर ते करंजा जेट्टी हे सागरी १८ किलोमीटर अंतर निर्धारित वेळेपेक्षा कमी वेळेत पोहून पार करत पुन्हा एकदा नवा इतिहास घडवीला आहे. गेल्यावर्षी मयंकने ३ डिसेंबर २०२३ रोजी धरमतर ते करंजा जेट्टी हा प्रवाह (चॅनेल ) पोहून पार केला. आता घारापुरी ते करंजा हा प्रवाह ( चॅनेल ) पोहून जाणारा मयंक म्हात्रे हा पहिला जलतरण पटू आहे. धरमतर ते करंजा जेट्टी पोहून जाणारा व घारापुरी ते करंजा जेट्टी पोहून जाणारा मयंक म्हात्रे हा पहिलाच व एकमेव जलतरणपटू आहे. हे दोन्ही प्रवाह (चॅनेल )सर्वप्रथम पोहण्याचे नवीन विक्रम मयंक म्हात्रे याच्या नावावर आहेत. त्यामुळे मयंक म्हात्रे याचे नाव या चॅनेल वर प्रथम जलतरण पटू म्हणून कायमचे कोरले गेले आहे.
११ वर्षीय मयंक म्हात्रे हा सेंटमेरी कॉन्व्हेंट स्कूल उरण येथे शिकत असून कोंढरीपाडा करंजा येथे तो वास्तव्यास आहे. दररोज ५-५ तास तो पोहण्याचा सराव करत असे. त्यातून सर्वांच्या मार्गदर्शनामुळे ३ डिसेंबर २०२४ रोजी उरण तालुक्यातील घारापुरी ते करंजा जेट्टी हा समूद्रातील प्रवाह( चॅनेल )पोहून त्यांनी नवा विक्रम केला आहे. घारापुरी ते करंजा हे अंतर सहा तासाच्या आत पूर्ण अपेक्षित होते मात्र मयंकने ते अंतर पाच तास २९ मिनिटात पूर्ण केले. गेल्यावर्षी धरमतर तर ते करंजा जेट्टी कमी वेळेत व कमी वयातील जलतरणपटू म्हणून पोहण्याचा विक्रम केला तसेच ३ डिसेंबर २०२४ रोजी घारापुरी ते करंजा जेट्टी कमी वेळेत, कमी वयात पूर्ण केल्याचे दोन्ही रेकॉर्ड मयंक म्हात्रे यांच्या नावावर आहेत.
मयंक म्हात्रे करंजा जेट्टी येथे सकाळी पोहोचताच करंजाचे ग्रामस्थ, विविध सामाजिक संस्था, संघटनांनी त्याचे ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत स्वागत केले. करंजा जेट्टी येथे मयंक म्हात्रे याचा छोटेखानी सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते प्रितम म्हात्रे,शेतकरी कामगार पक्षाच्या महिला उरण तालुका अध्यक्ष सीमा घरत,सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर, महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष राजीव कोळी, संघटनेचे निरीक्षक शैलेश सिंग, एडवोकेट सागर कडू, प्राध्यापक एल बी पाटील, सामाजिक कार्यकर्ते सीताराम नाखवा, चाणजे ग्रामपंचायतचे सरपंच अजय म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते दिनेश थळी, नितीन कोळी, हेमलता पाटील, संजय ठाकूर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मयंक म्हात्रे याला सुरवातीपासून त्याचे आई वीणा दिनेश म्हात्रे व वडील दिनेश म्हात्रे यांचे मार्गदर्शन लाभले. मयंकच्या या ऐतिहासिक कामगिरीस प्रशिक्षक किशोर पाटील, प्रशिक्षक हितेश भोईर यांचे महत्वाचे मार्गदर्शन लाभले आहे तर उरण तालुका हौशी जलतरण संघटनेचे सचिव सुनिल पाटील, प्रशिक्षक मनोहर टेमकर, जलतरण पटू आर्यन मोडखरकर, जयदीप सिंग, वेदांत पाटील, रुद्राक्षी टेमकर, आर्य पाटील आदींचे सहकार्य या विक्रमा दरम्यान लाभले आहे. मयंक म्हात्रे याच्या आजपर्यंतच्या कामगिरीची दखल घेत त्याची निवड स्पर्धेसाठी सेंटमेरी स्कुलच्या माध्यमातून राज्यस्तरावर झाली आहे.उरण नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्हा, मुंबई जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या मयंक दिनेश म्हात्रे वर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.