भादाव पुल मोजतोय अखेरची घटका ; गेली अनेक वर्षे चारचाकी वाहतुक बंद
भादाव गावाला जोडणारा नवीन पुल बांधण्याची राजीव साबळे यांची मागणी

प्रतिनिधी – अरुण पवार ( माणगाव ) माणगाव नगरपंचायत हद्दीत असणारा आणि भादाव गावाला जोडणारा काळ नदीवरील भादाव पुल जीर्ण झाला असून तो शेवटची घटका मोजत असल्याची चिन्ह सध्या दिसत आहेत. दगडी बांधकाम असलेल्या या पुलाला तडे गेले आहेत तर ठिकाठिकाणी झुडपे वाढलेली आहेत. या पुलावरून गेली अनेक वर्षे चार चाकी वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. भादाव गावातील ग्रामस्थ दररोज या पुलावरून जीव मुठीत धरून अनेक वर्षे ये जा करीत आहेत. हा जुना पुल अखेरची घटका मोजत असून तो कधीही कोसळून पडून जमीनदोस्त होऊ शकतो अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे भादाव गावाला जोडणारा पुल हा नव्याने बांधण्यात यावा अशी मागणी शिवसेना प्रवक्ते ॲड. राजीव साबळे यांनी केली आहे.
माणगांव आणि भादाव गावाला जोडणारा पुल हा कालव्याचे पाणी जाण्यासाठी १९७७ साली बांधला आहे. त्यामुळे हा पुल आतून भुयारी मार्गाचा आहे. त्यांच्या वरुन अवजड वाहतूक होत नाही. गेली अनेक वर्षे भादाव गावात चारचाकी आणि तीन चाकी वाहने यांची रहदारी या पुलावरून होत नाही. या पुलावरून केवळ दुचाकी वाहनांची रहदारी सुरू आहे. या गावात जाण्यासाठी काळ नदीच्या पुलावरून वळसा मारुन जावे लागते. पावसाळ्यात पुर आल्यावर भादाव गावाचा माणगाव शहराशी संपूर्ण संपर्क तुटतो. या गावात १ हजार लोकवस्ती आहे. नुकतीच कुंभे – केळगण या महत्वकांक्षी विद्युत प्रकल्पातील विस्थापितांच्या ५०० घरांच्या वसाहतींचे गाव उभारण्यात आले आहे. त्यांनाही मोठ्या प्रमाणावर अडचणी आणि गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याने आगीतून फोफाट्यात आल्याची खंत असून ते संताप व्यक्त करीत आहेत.
नवीन पुल बांधल्यास माणगाव शहरासारखं भादाव गावाला महत्त्व प्राप्त होऊ शकतो. विशेषतः निजामपूर रोड जवळील कालव्यामार्गे भादाव आणि विंचवली ते ढालघर जोड रस्त्याला जोडले जाऊन मुंबई गोवा महामार्गाला जोडला जाईल. त्यामुळे हा बायपास होऊन दिवसेंदिवस वाढती वाहतूक कोंडी कमी होईल. कळमजे बायपास आणि काळ नदी वरील पुल होण्यासाठी अजून काही वर्षे लागतील. त्यापुर्वी हा भादाव पुल बांधण्यात आल्यास वाहतूक कोंडी होणार नाही. भविष्यात माणगाव शहर रायगड जिल्ह्याची मध्यवर्ती राजधानी आणि जिल्ह्याचे ठिकाण होणार आहे असे खासदार सुनील तटकरे यांनी यांनी निवडणूक दरम्यान माणगाव येथील निवडणूक सभेत जाहीर केले होते. तसेच भादाव पुलाला मंजुरी मिळवून देईन असे आश्वासन दिले होते. त्याची पुर्तता तातडीने करावी अशी मागणी शिवसेना प्रवक्ते ॲड. राजीव साबळे यांनी केली आहे.
याबाबत खासदार सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांनी सांगितले की, या भादाव पुलाकरीता २४ कोटींचे अंदाज पत्रक तयार झाले आहे. मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता अचानक लागल्याने मंजुरी घेता आली नाही. आता आचारसंहिता संपली असून नवीन मंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत किंवा अधिवेशनामध्ये भादाव येथील नवीन पुल बांधण्याची मंजुरी मिळेल. तसेच कळमजे बायपास महामार्गाचे नव्याने निविदा काढण्यात येणार आहे असे सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांनी आश्वसित केले.
या विधानसभा निवडणुकीत आदिती तटकरे यांना माणगाव शहरातून ४४०० इतके भरभरून मतदान झाले आहे. तसेच पोस्टलची ८०० मते मिळून ५२०० एवढ्या भरघोस मतांचे भरघोस मताधिक्य आदिती तटकरे यांना माणगाव करांनी देऊन आपले दिलेले वचन शिवसेना प्रवक्ते ॲड. राजीव साबळे आणि माजी नगराध्यक्ष आनंद यादव यांनी पूर्ण केले आहे. त्यामुळे खासदार सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांनी माणगाव करांना विकास कामांच्या बाबतीत दिलेली आश्वासने पूर्ण करावी अशी जोरदार चर्चा सुरू आहे.