हरिहरेश्र्वर येथील समुद्र किनारी विसर्जित देवी देवतांचे शिल्प भग्नावस्थेत ; भाविकांमध्ये नाराजी
उघड्यावर पडलेल्या मुर्त्यांचे संग्रहालय करुन जतन करण्याची भाविक आणि पर्यटक यांची मागणी

प्रतिनिधी – अरुण पवार ( माणगाव ) श्रीवर्धन येथील हरी हरेश्र्वर या तिर्थक्षेत्राला अथांग, स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारा लाभला आहे. हा समुद्र किनारा पाहण्यासाठी दररोज हजारो भाविक आणि पर्यटक येत असतात. मात्र या समुद्र किनाऱ्या जवळ विसर्जित देवी देवतांचे शिल्प उघड्यावर भग्नावस्थेत पहावयास मिळत असल्याने भाविकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
श्रीवर्धन तालुक्याला अथांग निळाशार समुद्र किनारा लाभला आहे. हा समुद्र किनारा पाहण्यासाठी पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे तसेच जवळच असलेल्या तिर्थक्षेत्र हरी हरेश्र्वर आणि दिवेआगर येथेही भाविक मोठ्या संख्येने येत असतात. मात्र दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या हरी हरेश्र्वर येथील समुद्र किनारी विविध देवी-देवतांचे सुंदर दगडी शिल्प भग्नावस्थेत इतरत्र आणि अस्ताव्यस्त पडलेल्या पहावयास मिळतात. त्यामुळे भाविक संताप व्यक्त करीत आहेत. तसेच अशा प्रकारच्या मुर्ती शिल्प पाहून अतीव दुःख आणि यातना होत आहे असे उपस्थित भाविकांनी खंत व्यक्त केली आहे.
याबाबत अधिक माहिती घेतली असता सांगण्यात आले की, काही मंदिरांचा नव्याने जिर्णोध्दार केला जातो तर काही देवालयातील देवी देवतांच्या मूर्ती जीर्ण झालेल्या असतात तर काहींची झीज होत असते. त्या मुर्ती हरी हरेश्र्वर या पवित्र स्थळी समुद्रात विसर्जित केल्या जातात. या विसर्जित केलेल्या मुर्त्या कित्येक वर्षे अशाच या समुद्र किनारी उन, वारा, पाऊस, वादळात निपचित उघड्यावर पडलेल्या पहावयास मिळतात. या हरिहरेश्वर ठिकाणी मृत्यु पावलेल्या व्यक्तिला मोक्ष मिळण्यासाठी दहावा देखील इथेच केला जातो, या दहाव्याच्या विधीचे विसर्जन करण्यासाठी याच जागेत जावे लागते अशा वेळी या उघड्यावर भग्न अवस्थेतील एखाद्या मुर्तीवर चुकून पाय पडण्याची शक्यता नाकारता येत नाही या करिता या उघड्यावर पडलेल्या आणि पुरातन अशा दगडी मुर्तीचे पर्यटकांना पाहण्यासाठी संग्रहालय करुन त्यांचे जतन करून संवर्धन करावे किंवा या मुर्ती गोळा करुन जमिनीत पुरून टाकाव्यात. जेणेकरून या हिंदू देवतांचे भग्न अवस्थेतील मुर्त्या पाहून यातना आणि दुःख होणार नाही अशी प्रतिक्रिया पर्यटक भाविकांकडून देण्यात आली.