नागोठणे विभाग पत्रकार असोसिएशनचे पुरस्कार
बळवंत वालेकर, प्रशांत गोपाळे व साहिल रेळेकर यांना जाहीर

प्रतिनिधी – महेश पवार ( नागोठणे )– गेली अकरा वर्षे सातत्याने आपला वर्धापन दिन नित्यनियमाने साजरा करून नागोठणे शहर व ग्रामीण विभागात नावलौकिक मिळविलेल्या नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनचा बारावा वर्धापन दिन सोहळा लवकरच साजरा होत असून पत्रकार असोसिशनकडून देण्यात येणारे विविध पत्रकार पुरस्कार पत्रकार असोसिएशनच्या बैठकीत जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार पत्रकार असोसिएशनचा मानाचा पुरस्कार समजला जाणारा कै. तात्यासाहेब टके ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार अलिबाग येथील ज्येष्ठ पत्रकार व साप्ताहिक कुलाबा वैभवचे संपादक श्री. बळवंत वालेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच दैनिक पुढारीचे खालापूर येथील पत्रकार श्री. प्रशांत गोपाळे यांना उत्कृष्ठ पत्रकार तर दैनिक पुण्यनगरीचे पनवेल येथील पत्रकार साहिल रेळकर यांना युवा पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला. याच बैठकीत नागोठणे शहर व ग्रामीण विभागासह जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात येणार असल्याचे यावेळी ठरविण्यात आले.
या कार्यक्रमाची जय्यत तयारी पत्रकार असोसिएशनकडून करण्यात आली असून यासंदर्भात संघटनेची एक बैठक नुकतीच घेण्यात येऊन या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. नागोठणे ग्रामीण विभाग संघटनेचे मार्गदर्शक भाई टके यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आलेल्या या बैठकीला पत्रकार असोसिएशनचे संस्थापक शामकांत नेरपगार, अध्यक्ष अॅड. महेश पवार, सचिव अनिल पवार, उपाध्यक्ष सुनील कोकळे, सहसचिव राजेंद्र जोशी, सदस्य विनोद भोईर, दिनेश ठमके, चेतन टके, राजेश पिंपळे, सचिन नेरपगार आदी उपस्थित होते.