पेण येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आत्मक्लेश आंदोलन
शिवसैनिक रवींद्र पाटील यांनी रस्त्यावर लोटांगण घालून मागितली महाराजांची माफी

प्रतिनिधी- दिपक लोके (पेण) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्ग येथील मालवणमध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता या पुतळ्याचे मोठ्या थाटात अनावरणही करण्यात आले. परंतु अवघ्या आठ महिन्यांतच हा पुतळा कोसळल्याने जनभावना उफाळून आल्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह बांधकाम मंत्र्यांनी राजीनामा देऊन महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी राज्यातील शिवप्रेमी संघटना आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष निषेध आंदोलनातून राज्यभर व्यक्त करीत आहेत
आज पेणमध्येही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षा तर्फे शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विष्णु भाई पाटील यांच्या मार्गदर्शनात आत्मक्लेश आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आले. या आंदोलनात जेष्ठ शिवसैनिक रविंद्र पाटील यांनी रस्त्यावर लोटांगण घालून “महाराज माफ करा” अशा घोषणा देत आपला निषेध व्यक्त केला. मतदार ५०० रुपयांना विकला जातो, सरकारच्या लाडक्या योजनेला भुलतो, पैशातून सत्ता आणि सत्तेतुन पैसा त्यामुळे गटार आणि रस्त्यावर फोफाळणारा भ्रष्टाचार आता छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत या भ्रष्टाचारी सरकारने आणून ठेवला आहे. या सगळ्याला आपणच जबाबदार आहोत असे सांगत महाराजांची माफी मागत रविंद्र पाटील यांनी हे आत्मक्लेश आंदोलन केले.
यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख विष्णु भाई पाटील, रविंद्र पाटील, नरेश गावंड, योगेश पाटील, जीवन पाटील, प्रवीण पाटील, तुकाराम म्हात्रे, भगवान पाटील, सुहास पाटील आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक हजर होते.