त्वष्टा कासार (तांबट) समाजाची वस्तूंची परंपरा माहित व्हावी म्हणून गिरीश पोटफोडे यांनी उभारलं “आनंदी संसार” वस्तू संग्रहालय..
प्रसिद्ध शिवव्याख्याते सचिन करडे यांची "आनंदी संसार" संग्रहालयाला दिली सदिच्छा भेट..

प्रतिनिधी – संतोष उध्दरकर. ( म्हसळा ) हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री आईसाहेब जिजाऊ माता आणि पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानी पावन झालेली पुणे येथील कसबा पेठ. कसबा पेठ बोलले कि डोळ्यासमोर येते ती तांबट आळी आणि तिथे तांबा – पितळेची भांडी बनवण्यासाठी उभे असलेले जुने कारखाने..जुन्या काळात हिच भांडी कौटुंबिक संसाराला आणि सामाजिक कार्यक्रमात वापरात होती पण काळाच्या ओघात हि भांडी वापरण्याच्या पद्धतीत बदल झालेला बघायला मिळतो आहे. आपल्या भावी पिढीला ह्या वस्तूंचे पूर्वीचे वापरातील महत्व आणि भविष्य काळासाठी महत्व याची उत्तम सांगड घालून विविध प्रकारच्या सुमारे शेकडो ताब्या – पितळेच्या दुर्मिळ वस्तूंचे जतन करीत इतिहास परंपरा व संस्कृती सांगणारे वस्तूंचे संग्रहालय आमचे मित्रवर्य मार्गदर्शन गिरीश पोटफोडे यांनी कसबा पेठ, पुणे येथे “आनंदी संसार” या नावाने स्थापन केले आहे.
परिश्रमातून जिज्ञासूवृत्तीने नव्या पिढीला जुना काळ वस्तूंच्या रुपात आणि नव्या काळातील तांबे, पितळ आणि चांदीच्या वस्तू कळाव्यात यादृष्टीने या संग्रहालयाची निर्मिती केली आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मानवी श्रमाचा वापर कमी होवून यंत्राचा वापर वाढला आहे. अशा परिस्थितीत सध्याच्या पिढीला आई, वडील, आजी, आजोबा, पणजोबा यांच्या काळात किंबहुना त्याही पूर्वीच्या काळात जगण्याची पद्धत आणि साधने कशी होती याची परंपरा या संग्रहालयात अनुभवता येते. गिरीश पोटफोडे यांनी आपल्या घराखाली एका छोट्या खोलीत याची लक्ष्यवेधी सुरेख मांडणी केली आहे. नजर टाकताच जुन्या काळातील जीवनाचे चित्र उभे राहते. पुण्यातली तांबट आळी हे कसबा पेठेतील प्रसिद्ध ठिकाण पण कमी झालेली तांबा, पितळेची मागणी आणि त्याच बरोबर इतर व्यवसायात कडे वळलेले लोक त्यामुळे इथली खासियत असणाऱ्या जुन्या वस्तू कमी होत गेल्या. इथली संस्कृती, इथली खासियत जिवंत रहावी आणि लोकांना ती कळावी यासाठी आमचे मित्रवर्य मार्गदर्शक गिरीश पोटफोडे धडपडताहेत. “आनंदी संसार” या नावाने त्यांनी कसबा पेठ, पुणे या ठिकाणी जवळपास हजारो वस्तूंचं प्रदर्शन उभारले आहे. कसबा पेठेत राहणारे श्री गिरीश पोटफोडे शिक्षण पूर्ण झाले तसे नोकरीला टाटा मोटर्स मध्ये त्यांनी अनेक वर्ष नोकरी केली. मात्र तांबट आळीतल्या वस्तूंची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातच त्वष्टा कासार मंडळाच्या श्री गणेश उत्सवाच्या शताब्दीच्या निमित्ताने एक प्रदर्शन भरवलं गेलं. त्यावेळी मांडलेल्या वस्तू बघून पोटफोडे यांची आवड त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यातच ते टाटा कंपनीतून निवृत्त ही झाले आणि मग त्यांनी आपल्या आवडी कडेच लक्ष द्यायचे ठरवले. आणि यातूनच उभा राहिला “आनंदी संसार” पण अर्थातच ही जुनी भांडी गोळा करणे सोपं नव्हतं . काही भांडी माझ्या घरातच होती. अगदी आजीच्या काळातले घंगाळे, बंब, अशा काही वस्तू. पण इतरही आणि वस्तू गोळा करायच्या होत्या. त्यासाठी मग परिसरातल्या ओळखीच्या लोकांपासून ते अगदी जुन्या बाजारापर्यंत सगळीकडच्या फेर्या झाल्या. एक एक करत वस्तू गोळा होत गेल्या आणि त्यातूनच हे घरगुती प्रदर्शन उभ राहिल्याचं गिरीश पोटफोडे सांगतात आत्ता त्यांच्याकडे मोठा लहान असे बंब, अष्टविनायक तांब्या भांडे, ताब्याचे ग्लास, चहाची किटली, शाळेचा डबा, पेट्या, प्रवासी तांब्या, टाळ, वजन, वजन काटा, शिक्षणाचा श्रीगणेशा करणारी दगडी पाटी, आजीचा ताब्याचा बटवा, सौंदर्य खुलवणारी आइना पेटी, तांब्याची पितळी भांडी, फिरके तांबे, चिमणी दिवा, गदा, तलवार, ताब्याची राजमुद्रा, रवी, मुसळ, दगडी पाट, कंदील, पितळी ताजमहाल, पितळी खेकडा, पितळी घोडा, सिंह, तबकडी, मानपत्रे, त्वष्टा कासार समाजाच्या श्री गणेश मूर्तीची प्रतिकृती, पानपुडे, लोखंडी वजने, चांदीची छाप, वजनाचा काटा, परदेशातील किचेन, सुमारे १७७८ चे पितळेचे घंगाळ, कुलूप अशी अनेक पुरातन वस्तूची कुतूहलाने पाहणी करावीच लागते अशी जपणूक आणि मांडणी केली आहे.
छत्रपती श्री शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांच्या काळातील नाणी तसेच परकीय चलने आहेत. परदेशातील चलनही पोटफोडे यांच्या संग्रही आहेत ते ही पाहता येते.अशा अनेक वस्तू गोळ्या झाल्या आहेत याचं त्यांनी घरातल्या घरात एक प्रदर्शनही उभे केले आहे. यासाठी पदरचे लाखो रुपये त्यांनी खर्च केले आहेत. हे सगळं कशासाठी हे सांगताना पोटफोडे म्हणाले, ” पूर्वी आमच्या तांबट आळीत तांब्या-पितळेची भांडी बनवणाऱ्या लोकांची जवळपास तीनशे घरं आणि कारखाने होते. पण आता त्यातले तीस शिल्लक राहिलेत. त्यातही अनेक जण अँटिक वस्तूंकडे वळले आहेत. त्यामुळे जुन्या पारंपरिक वस्तू नेमक्या होत्या कश्या आणि त्या मिळतात कुठे हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मी हे प्रदर्शन उभारले. माझ्या प्रदर्शनात कोण काय वस्तू बनवतो याची माहिती आहे. जेणेकरून लोक ते थेट खरेदी ही करू शकतील. श्री गिरीश पोटफोडे यांच्या कसबा पेठेतल्या घरी हे प्रदर्शन जाऊन पाहता येते. तांबे पितळेच्या भांड्यांचं एक मोठं संग्रहालय उभं करण्याची त्यांची प्रबळ इच्छा आहे असे रायगड जिल्ह्यातील म्हसळ्यातील गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, शिवव्याख्याते श्री सचिन करडे यांनी सांगितले.