
माणगाव – माणगाव येथील शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या शिपुरकर आणि वाघरे इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील इयत्ता सहावीतील विद्यार्थी कुमार सार्थक सुशील महामुणकर याने मुंबई येथे झालेल्या कोकण विभागीय धनुर्विद्या स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवून कांस्य पदक पटकावले. त्यामुळे त्याची नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या यशाबद्दल सार्थक म्हामुणकर याचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.
सार्थक याचे प्रशिक्षक बाळू ढेबे यांनी खूप मेहनत घेऊन प्रशिक्षण दिले. लहान वयातच सार्थकने धनुर्विद्या प्रशिक्षण घेऊन ध्येयाचे अचूक लक्ष गाठले आहे. या खेळात अत्यंत संयमाने लक्ष विचलित न करता लक्ष ठेवावे लागते. कोणत्याही प्रकारची सुविधा नसताना सार्थक याने आपली आवड जपून राज्य पातळीवरील स्पर्धा जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.
सार्थक महामुणकर याच्या उदंड यशाबद्दल माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे, सेक्रेटरी कृष्णा भाई गांधी, चेअरमन नरेंद्र गायकवाड, अरुण पवार, मुख्याध्यापिका मनिषा मोरे, सर्व कमिटी सभासद, शिक्षक यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.